राज्य सरकार व जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार कणकवलीतील 5 मंगल कार्यालयांची झाली तपासणी
कोरोना संबंधी नियम पाळण्याच्या दिल्या सूचना, अन्यथा कडक कारवाई होणार
कणकवली
कोरोना च्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळे किंवा इतर समारंभ हे पन्नास लोकांच्या उपस्थितीत व कोरोना संदर्भात या नियमांचे पालन करून करण्याच्या सूचना असतानाही अनेक ठिकाणी लग्नसोहळे किंवा इतर समारंभांमध्ये होणारी गर्दी रोखण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कणकवली नगरपंचायत च्या पथकामार्फत कणकवलीतील 5 मंगल कार्यालयांची रविवारी तपासणी करण्यात आली. या पाच मंगल कार्यालयांमध्ये नगरपंचायत पथकाच्या भेटीदरम्यान कोरोना च्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. तसेच अनेक लग्नसोहळे किंवा समारंभांना रीतसर परवानगी घेतली जात नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे संबंधित मंगल कार्यालय मालकांना यासंदर्भात सक्त सूचना देण्यात आल्या असून, लग्नसोहळे किंवा इतर समारंभ आयोजित करताना त्यात कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या सूचनांचे येत्या काळात पालन झालेले दिसले नाही तर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. नगरपंचायत च्या या पथकात रवी महाडेश्वर, सिद्धेश सावंत व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. नगरपंचायत पथका मार्फत अचानक सुरू झालेल्या या तपासणीमुळे मंगल कार्यालय मालकांची व वधू-वराच्या दोन्ही बाजूंची मात्र धावपळ उडाली.