*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कालचक्र*
(पादाकुलक वृत्त)
काळ कुणाचा मित्र नसावा
राखत असतो इतके अंतर
आघात करे नकळत तेव्हा
चालत नसते जादू मंतर
श्रीमंती अन् गरिबी दोन्ही
पारड्यात एकाच तोलतो
देव देव का करत असेना
कर्माचा तो हिशोब करतो
कुणी माजला उन्मत्त जसा
काळ ठेवतो अंकुश त्यावर
ना सुधारला भोग भोगुनी
कठोर शिक्षा देतो सत्वर
सुख असो की दुःख मनाशी
दया नि माया काळ न जाणे
ना आवडता कोण तयासी
म्हणुन वागतो परक्याप्रमाणे
कालचक्र हे सदैव फिरते
कधी न थांबे कोणासाठी
पुढे धावतो धुडकावूनी
त्याच्या पाठी बसते लाठी
©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
