*नेहरू विज्ञान केंद्रात रस्त्यावरील बालकांची शैक्षणिक सहल*
जीवन आनंद संस्थेचा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रेरणादायी उपक्रम
मुंबई :
“आज रस्त्यावर दारिद्र्यामुळे वंचित अवस्थेत जीवन जगणारी बालके ही उद्याच्या भारताची जबाबदार नागरिक आहेत. त्यांना आनंददायी शिक्षणाची संधी आणि शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळालाच पाहिजे,” असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जीवन आनंद संस्था तर्फे कार्यरत कार्व्हर डे सेंटरमधील बालकांसाठी नेहरू विज्ञान केंद्र येथे विशेष अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत सहभागी झालेल्या १७ बालकांनी प्रथमच सांताक्रूझ ते नेहरू विज्ञान केंद्र असा भुयारी मेट्रो प्रवास अनुभवला. हा प्रवास त्यांच्या दृष्टीने अत्यंत रोमांचक आणि संस्मरणीय ठरला.
संस्था मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यात रस्त्यावरील निराधार व बेघर बांधवांच्या पुनर्वसनासाठी आश्रम व शेल्टर होमच्या माध्यमातून कार्यरत आहे. मुंबईतील खाररोड परिसरात पदपथावर राहणाऱ्या कुटुंबांच्या बालकांसाठी डे केअर सेंटर चालवून त्यांना शिक्षण आणि संस्काराची जोड दिली जाते.
या अभ्यास सहलीचा मुख्य उद्देश बालकांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे आणि त्यांच्या जिज्ञासेला चालना देणे हा होता. नेहरू विज्ञान केंद्रात विविध वैज्ञानिक प्रयोग, प्रत्यक्ष हाताळणीची मॉडेल्स आणि विज्ञानाधारित खेळांच्या माध्यमातून मुलांनी विज्ञानाचा अनुभव घेतला. प्रत्यक्ष सहभागातून शिकताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास लक्षणीय होता.
या उपक्रमामुळे वंचित बालकांना केवळ शैक्षणिक अनुभवच नव्हे, तर “आपणही सक्षम आहोत” हा सकारात्मक आत्मविश्वास मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन आनंद संस्थेचे असे उपक्रम प्रेरणादायी ठरत आहेत.
सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी कार्व्हर डे सेंटरच्या मिना पटेल, श्रेया घाडीगावकर, कविता कदम, गोविंद मार्गी आणि रूपेश गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विश्वस्त किसन चौरे आणि प्रज्ञा राणे यांचाही सक्रिय सहभाग लाभला.
