*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अशी होळी करू साजरी…!*
रंग उधळूया मनात, द्वेष,मत्सर जाळू आधी
मनामनात पेटवू प्रेमाची उजळून ज्वाळी;
जात-धर्माची राख उडो वार्यावर सारी,
आपुलकीचा सुगंध पसरू दे
अशी होळी करू साजरी…
निंदा-तिरस्काराची काडीकाडी जाळूया,
संवेदनांची ऊब अंगणात उगवूया;
हात हातात घेऊन चालूया सारी,
सामंजस्याच्या रंगात
अशी होळी करू साजरी…
निसर्गाचे रंग जपू, पाणी वाचवूया
शब्दांचे फटके नको शांततेचे व्रत घेऊ;
स्वच्छ विचारांची उधळण करू घरोघरी,
हरित होळीच्या संकल्पात
अशी होळी करू साजरी…
अनाथ,उपेक्षित,थकलेल्या जीवांसाठी,
आशेचा गुलाल लावू कपाळी;
दया-दातृत्वाचा रंग व्हावा साजरी,
मानवतेच्या स्पर्शाने
अशी होळी करू साजरी…
खोटेपणाची राख जाळू अंतरंगात
सत्याचा रंग खुलवू प्रत्येक रंगात;
मौनातील अर्थही बोलू दे भारी,
प्रामाणिकतेच्या प्रकाशात
अशी होळी करू साजरी…
उद्याच्या हातात आजची जबाबदारी
समतेची मशाल धरू दृढ निश्चयी;
एकात्मतेच्या रंगांनी न्हाऊ दे
वस्त्या-गल्ल्या सारी,
नव्या भारताच्या स्वप्नात
अशी होळी करू साजरी…
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
