नगरसेवक देव्या सूर्याजी यांची पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील बाजारपेठ परिसरात अनेक ठिकाणी बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत तसेच रहदारीच्या ठिकाणी असलेल्या मच्छी मार्केट परिसरात होमगार्ड किंवा पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक श्री. देव्या सूर्याजी यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधील जय भवानी चौक, सालईवाडा, जय प्रकाश चौक आणि गांधी चौक या भागात अनेक वर्षांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत होणाऱ्या चोरीसह विविध घटनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. अशा घटनांमध्ये पुरावे मिळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत आवश्यक असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने हे कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच सावंतवाडी शहरातील मच्छी मार्केट परिसरात दर रविवार आणि बुधवार मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. परिसरातील रहिवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही वेळा गंभीर रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिकादेखील या कोंडीत अडकण्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या पार्श्वभूमीवर दर रविवार व बुधवार या दिवशी मच्छी मार्केट परिसरात किमान चार होमगार्ड किंवा पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेवक श्री. सूर्याजी यांनी पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच पोलीस उपअधीक्षक यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी ॲड. प्रथमेश प्रभू, ॲड. प्रसाद नाटेकर, प्रफुल गोंदावळे आणि निलांग सावंत उपस्थित होते.
