*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग: ५२
*पिकर*
“परत्येक कार्यक्रमाक पिकरची गरज आसता काय?” काकल्याने आल्या आल्याच प्रश्न विचारला.
मला काही अंदाज येईना. मग मी विचारलं,”का रे? काय झालं?”
“परवा शिवजयंत्येक दिसभर पिकर आरडा होतो. ह्या पिकरात्सून राज्याबद्दलचा प्रेम,अभिमान कसो काय दिसान येता? सब्बन दिस पिकर लायण्याचा कारण काय? सकाळी तासभर आणि सांचो तासभर वाजयल्या भागाचा नाय काय?” काकल्या जोराजोरात ओरडत विचारत होता.
मी म्हणालो,”अरे, तुझं हे ध्वनिप्रदूषण आधी कमी कर. हळू बोल ना रे. स्पिकराचं बघूया, तू आधी तुझा व्हॉल्यूम कमी कर.”
काकल्या खरंतर बरोबर बोलत होता. स्पिकर वाजवण्याचे स्तोम हल्ली खूपच वाढत चाललेय. प्रत्येक उत्सवात स्पिकर जोरजोरात वाजत असतो. त्याला काही धरबंद नसतोच.
मी केलेल्या मस्करीकडे दुर्लक्ष करीत काकल्या म्हणाला,”मी हुंतय, खरातर ल्हानशे साऊंड बाॅक्स वापरूक होये. आवाज कमी ठेवक् होयो. कर्ण्यांची गरजच नाय. ती पुन्यालाच अधिक तरास दितत. कित्याक आणि खेका ह्या ज्यगाक आयकयतासात? आदिच न्हय न्हय त्या आवाजानी जीव कंठाळलाहा. तेतूर भर कित्याक?” काकल्या पोटतिडीकीने बोलला. दिवसेंदिवस अनेक बाबतीत चुकीचे जपले जातेय आणि चुकीचे वाढवले जातेय. आपण शांततेपासून दूरदूर जातोय.
” परत्येक माणूस हुंता माका शांतता होई. मगे सगळ्या उत्सवात गोंगाट कित्याक? शांत रवल्यात तर कायतरी बरा चित्शात. नायतर फक्त उत्साव आणि पैशाचो खेळ. देवळात देकूल लोक उत्सवात जातत आणि ते येळाक गोंगाट आसता. एरवी देवळात कोन नसता, शांतता आसता; त्येवा कोन जावक् बगणा नाय. मी तुका सांगतय, ह्यो माणूस मेल्यारच शांत जाता, नायतर शांती मेळासाठी धावपळ करून शेवटी मरता.” काकल्या जायला उठला. जाताजाता खवचटपणे म्हणाला, ” आता फक्त तिरडेक पिकराच्ये कर्णे बांधूचे रवलेहत.” मला अशांत करून काकल्या चालता झाला.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
