You are currently viewing मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या- वैभव नाईक

मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या- वैभव नाईक

*मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या- वैभव नाईक*

*आरोग्य व्यवस्थेची वाताहात होण्याअगोदर जिल्हाधिकारी यांनी अशी तत्परता का दाखवली नाही?*

*आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्या सी.एस. आणि डीनवर पालकमंत्री काय कारवाई करणार?*

कालचे मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ एक फार्स होता. तब्बल १२०० पेशंट उपचारा शिवाय का राहिले होते याची आधी चौकशी झाली पाहिजे. पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की, अशी आरोग्य शिबीरे घेण्यापेक्षा जे डॉक्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचे योग्य नियोजन करून रुग्णांना चांगली सेवा देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावी.जिल्ह्यातील अनेक पेशंट गोव्यात रेफर केले जातात. फॅक्चर झालेल्या रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी १५ दिवस ताटकळत रहावे लागत आहे. औषधे उपलब्ध नाहीत त्याकडे लक्ष देऊन सर्व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, मशिनरी, तंत्रज्ञ, औषधे उपलब्ध करा तरच जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल. रुग्णांना कायम स्वरूपी आरोग्य सेवा मिळाली पाहिजे असे कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग वासियांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी हे शिबीर घेतल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. मग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेची वाताहात होण्याअगोदर जिल्हाधिकारी यांनी अशी तत्परता का दाखवली नाही? जिल्हाधिकारी यांनी किती वेळा सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा आढावा घेतला? किती वेळा त्यांनी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. आणि १२०० रुग्ण उपचाराविना राहत असतील तर आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि डीन यांच्यावर पालकमंत्री काय कारवाई करणार? असा सवाल वैभव नाईक यांनी केला आहे.

वैभव नाईक म्हणाले, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार काल कणकवली मध्ये मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक आणि सिधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले. खरंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे हे कालच्या आरोग्य शिबिरावरून दिसून आले.काल जवळपास १२०० पेशंट ज्यांना उपचार मिळाले नव्हते त्यांना या शिबिरात आणण्यात आले. या शिबिरात ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी २२६ पेशंट तपासले असे जाहीर करण्यात आले.परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फ्रॅक्चर झालेल्या पेशंटनी १५ दिवस नंबर लावूनही त्यांचे ऑपरेशन होत नाही ही वस्तुस्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक हे ईएनटी कान-नाक-घसा तज्ञ आहेत त्यांनी ३१ पेशंट तपासले. याआधी कधीही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ओरोस सोडून असे पेशंट तपासले आहेत का? त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सात ते आठ ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्याठिकाणी त्यांनी अशी सेवा दिली होती का? अनेक खाजगी रुग्णालयात ते सेवा देतात मग ग्रामीण रुग्णालयात त्यांना अशी सेवा का द्यावीशी वाटली नाही? सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन आहेत त्यांनी काल एक ऑपरेशन केले आणि त्याचा मोठेपणा मिरवत आहेत. परंतु शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये किती डॉक्टर पगार घेतात आणि किती डॉक्टर प्रत्यक्षात त्याठिकाणी उपस्थित असतात, किती रुग्ण त्याठिकाणी बरे झाले आणि किती रुग्ण रेफर केले गेले हे प्रश्न आहेत. तीन वर्षापूर्वी एव्हढीच यंत्रणा जिल्ह्यात कार्यरत असताना त्यावेळी योग्य नियोजन होत होते मग आता का होत नाही? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्यात पालकमंत्री, जिल्हा शल्य चिकित्सक आणि डीन जबाबदार आहेत.त्यांच्याकडून जिल्ह्यातील रूग्णांना कायमस्वरूपी उपचार मिळू शकत नाहीत म्हणून मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिराच्या नावाखाली स्टंटबाजी करून लोकांची फसवणूक केली जात आहे. परंतु नागरिकांना जिल्ह्यात कायम स्वरूपी चांगली आरोग्य सेवा हवी आहे त्याबाबत सत्ताधारी काहीच करताना दिसत नाहीत. सावंतवाडीचे आमदार गेली अनेक वर्षे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारत आहेत.आणि कुडाळचे आमदार आम्ही सुरु केलेले महिला बाल रुग्णालय, शासकीय मेडिकल कॉलेज बंद व्हायले आले तरी डोळे मिटून आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जिल्हावासियांच्या आरोग्याची कोणतीही चिंता नाही अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा