You are currently viewing जिल्ह्यात सरसकट लॉकडाऊन करु नये….

जिल्ह्यात सरसकट लॉकडाऊन करु नये….

ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

सिंधुदुर्ग प्रातिनिधी
कोरोना महामारीमुळे सर्वत्र जागतिक मंदीची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, व्यापारी व सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया येत आहेत. सुरूवातीपासून जिल्हा प्रशासनाने उत्तम प्रकारे नियोजन करून कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवलेले आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन, व्यापारी व जनता या सर्वांच्या सहकार्यातून आपण जिल्ह्यात कोरोनावर चांगल्याप्रकारे मात करीत आहोत. त्यामुळे जिल्ह्यात सरसकट लॉकडाऊन करू नये अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
जिल्ह्यात काही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याची खबरदारी म्हणून प्रशासनाने घेतलेल्या योग्य निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. ज्या भागामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाने पॉझिटिव रुग्ण सापडत आहेत, अशा भागांमध्ये लॉकडाऊन करावे. लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करतांना स्थानिक प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर करण्यापूर्वी व त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी व्यापारी संघ, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांना विश्वासात घेतल्यास सर्वांच्या सोयीचे होईल. त्यामुळे व्यापारी, सर्वसामान्य ग्राहकांना तसेच नागरिकांना त्रास होणार नाही. गेल्या चार पाच महिन्यात सर्व व्यवहार ठप्प असून सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात सध्याच्या काळात लॉकडाऊन करू नये अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील, संघटक एकनाथ गावडे व कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली असून या विनंती पत्राचा विचार होऊन सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी विनंती केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा