*“आईची भाषा हा शिक्षणाचा पाया”*
*सुरेश ठाकूर*
*कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचा मराठी भाषा गौरव दिन*
आचरे –
‘आईचे दूध हा जीवनाचा पाया आहे तर आईची भाषा हा शिक्षणाचा पाया आहे. मातृभाषेतूनच शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. ’ असे उद्गगार सुरेश शामराव ठाकूर- अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांनी काढले . कोकण मराठी
साहित्य परिषद शाखा मालवण आणि आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ,आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महाविद्यालयाच्या सभागृहात “माझा मऱ्हाठाचिया बोलु कवतिके ” या विषयावर युवा वर्गाला मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर प्राध्यापिका श्रीमती भावना मुणगेकर आणि श्रीमती प्राध्यापिका प्रियांका हिंदळेकर या उपस्थित होत्या.
प्रारंभी श्री ठाकूर गुरुजी यांच्या हस्ते श्री. देवी सरस्वती व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले .
मार्गदर्शन करताना ठाकूर गुरुजी पुढे म्हणाले , “भाषा मरता देशही मरतो ! संस्कृतीचाही दिवा विझे ” हे कुसुमाग्रजांचे भाकित ओळखून आपण मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे असे ते म्हणाले . आपल्या भाषणात मातृभाषा, तिच्या बोलीभाषा, तिचे व्याकरण आणि सौदर्य यावर ठाकूर गुरुजींनी पुढे मार्गदर्शन केले. मराठीची गोडी लागण्यासाठी युवा पिढीने चोखंदळ वाचन आणि सकस लेखन केले पाहिजे. प्रारंभी आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ,आचरा च्या युवकांनी मराठी भाषा गौरव दिनाचा सुश्राव्य पोवाडा सादर केला. यात कु.दिक्षिता पाताडे, निकिता घाडीगावंकर, अमिशा पेडणेकर, मानसी केरकर, तन्वी पाडावे, साक्षी नरे, वैभवी कदम, या मुली सहभागी झाल्या होत्या. संगीत साथ भूषण नाईक व गजेंद्र कामतेकर यांनी दिली . या पोवाड्यामध्ये मानसी मेस्त्री हिने मुख्य शाहिराची भुमिका प्रभावीपणे साकारली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. भावना मुणगेकर यांनी केले . कविवर्य कुसुमाग्रज यांच्या *कणा* या कवितेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तर आभार सौ. प्रियांका हिंदळेकर यांनी मांडले.
