You are currently viewing माझी मराठी.. अभिजात मराठी

माझी मराठी.. अभिजात मराठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी मराठी.. अभिजात मराठी*

 

*”माझ्या मराठी मातीचा*

*लावा ललाटास टिळा*

*हिच्या संगाने जागल्या*

*दऱ्याखोऱ्यातील शिळा”*

 

असा मराठी भाषेचा गौरव करून महाराष्ट्राची संस्कृती, इतिहासाचे यथार्थ वर्णन केले आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत मराठी ज्ञानभाषा करण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले ते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज..! त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. ज्ञानपीठ, साहित्य अकादमी आणि पद्मभूषण असे अनेक पुरस्कार प्राप्त करणारे अग्रगण्य साहित्यिक “कुसुमाग्रज” म्हणजेच महाराष्ट्राचा, मराठीचा गौरव..!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारशाचे वर्णन करताना कवी कुसुमाग्रज म्हणतात…

*”माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात…संतांच्या शब्दात…इतिहासाच्या पानात…”*

या काव्यपंक्तीत कवींनी सह्याद्रीचे डोंगर संबोधले ते म्हणजे महाराष्ट्राचे अढळ धैर्य, कणखरपणा आणि निसर्गसौंदर्य…! कवींना संतांच्या अभंगांतून माणुसकी आणि भक्तीची अनुभूती येते तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, गड-किल्ले आणि मराठी साम्राज्याच्या इतिहासात मराठीपण गवसते आहे. कवींनी मराठी भाषेचे, साहित्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे वर्णन या सुंदर काव्य पंक्तीतून केलं आहे.

 

*”माझ्या मराठीची बोलू कौतुके | परि अमृतातेहि पैजासी जिंके | ऐसी अक्षरें रसिकें | मेळविन ||”*

 

“माझ्या मराठी भाषेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. माझी मराठी भाषा अमृतालाही पैजेत जिंकेल अर्थात ती अमृतापेक्षा अधिक गोड आहे, अशी रसिक अक्षरे मी निवडून रचना करेन” अशा शब्दांत मराठीची थोरवी सांगताना संत ज्ञानेश्वर माऊलींनी “ज्ञानेश्वरी” मधून मराठी भाषेविषयीचा अभिमान, तिची महती, श्रेष्ठत्व आणि गोडवा ओव्यांमधून वर्णिला आहे. संतांनी संत साहित्यातून मराठी भाषा चिरंजीव ठेवली आहे, साहित्यिकांनी लेखणीतून शब्दांची पखरण करून ती जोपासली..जतन केली आहे. मराठी भाषा आपल्या बोलीतून जन्मली आणि आईच्या ओवीतून निर्मिली आहे. भाषा बोलली तरच ती जिवंत राहते आणि त्यासाठीच मराठी भाषा आपल्या बोलीतून प्रत्येकाने जिवंत ठेवली पाहिजे. पण.., त्यासाठी आधी ती बोलली पाहिजे…वाचली पाहिजे, पुढच्या पिढीमध्ये तिची आवड निर्माण केली पाहिजे, शिकवली पाहिजे…अशीच आपली मराठी भाषा टिकवली तरच तिचे अभिजातत्व टिकेल.

 

*लाभले आम्हास भाग्य..बोलतो मराठी*

*जाहलो खरेच धन्य..ऐकतो मराठी*

*धर्म, पंथ, जात एक …जाणतो मराठी*

*एवढ्या जगात माय..मानतो मराठी*

 

ज्येष्ठ कवी सुरेश भट या काव्यपंक्तींमधून मराठी भाषेचा अभिमान दर्शविताना म्हणतात, मराठी बोलता आणि ऐकता येणे हे आमचे नशीब असून, ती आपली मातृभाषा असल्याने आम्हास धन्य वाटते. मराठी ही अशी भाषा आहे जी कोणतीही जात, धर्म न मानता सर्वांना एकत्र जोडते. इतक्या मोठ्या जगात मी मराठीला माझी मायबोली म्हणजेच आई मानतो.

भाषा ही संवाद साधण्याचे माध्यम असते हे जरी खरे असले तरीही, कविवर्य सुरेश भटांनी या गीतातून मराठी ही केवळ संवाद साधण्याचे माध्यम नसून ती आपला अभिमान आहे असे सांगितले. त्यामुळेच त्यांच्या या भाषेची महती सांगणाऱ्या, भाषेचा गौरव करणाऱ्या गीताचे बोल कानावर पडताच ऊर अभिमानाने भरून येतो..अंगावर काटे उभे राहतात अन् प्रत्येकाच्या मुखातून या गीताचे बोल आपोआप गुणगुणले जातात..

 

माझी मराठी ज्ञानोबा-तुकारामांची अभंगवाणी, शाहिरीचे शौर्य आणि कवींच्या भावपूर्ण शब्दलेण्यांनी नटलेली संस्कृती आहे. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची अभंगगाथा, संत एकनाथांचे एकनाथी भागवत अशा महान ग्रंथांनी मराठीला अध्यात्मिक आणि साहित्यिक उंची मिळवून दिली आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची परंपरा, मराठी बाणा आणि महाराष्ट्राची संस्कृती व्यक्त करते. माझी मराठी मनाचा हळुवारपणा जपते आणि विचारांची प्रगल्भता आपल्या अद्वितीय शब्दात मांडते. माझ्या मराठीला ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली अभंग परंपरा ते आधुनिक कवी केशवसुत, नामदेव ढसाळ, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे आदींपर्यंतची काव्याची अखंडित परंपरा लाभली आहे. अभंग, ओवी, श्लोक, पोवाडा, गवळण, भारुडे अशा संतसाहित्याच्या पायावर माझी मराठी भक्कम उभी असून तिला भावगीते, गझल, मुक्तच्छंद, चारोळी, बालगीते, विडंबन असा विशाल काव्य वारसा लाभला आहे. माझ्या मराठीच्या कवितांमधून केवळ भावभावना व्यक्त होत नाहीत तर समाजाभिमुख विचारांची देवाणघेवाण होते. माझी मराठी कवितेमधून दुःखावर फुंकर घालते अन् ललित मधून लालित्याची उधळण करते. पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्या, कथा, नाटके.. अण्णाभाऊ साठे, भालचंद्र नेमाडे यांच्या ग्रामीण व दलित साहित्याने माझी मराठी ओतप्रोत भरून चिरंतर शब्दांची पालखी वाहते आहे. भोंडल्याची गाणी, देवदेवतांच्या आरती आणि लोककला जिवंत ठेवणाऱ्या लोकगीतांतून माझी मराठी लोकसाहित्य जपते आहे.

 

आतापर्यंत मराठी भाषेला एकूण चार वेळा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आपल्याच सिंधुदुर्गातील शिरोडा जवळील आरवली गावचे सुपुत्र साहित्यिक वि. स. खांडेकर हे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ठरले होते. त्यानंतर कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या चार मराठी लेखकांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. हे महान साहित्यिक म्हणजे मराठीच्या शिरपेचातील मुकुटमणी आहेत.

 

आपल्या मायमराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेली कित्येक वर्षे लढा सुरूच होता. महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये अभिजात मराठी लढ्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यानंतर अभ्यासक, विविध मराठी साहित्यिकानी लढा उभारला. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी देखील अभिजात मराठीसाठी प्रयत्न सुरू केले. कित्येकांनी जळजळीत लेख लिहून केंद्र शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, साहित्य संमेलनांमध्ये आवाज उठवून, पंतप्रधानांना पत्र लिहून अशा एक ना अनेक माध्यमांद्वारे आपापल्या परीने प्रयत्न सुरूच ठेवले होते. परंतु शासकीय दरबारी मराठीला अभिजात दर्जा मिळालेला नव्हता..पण, म्हणून मराठी भाषा अभिजात नव्हती का..?

जी भाषा शेकडो वर्षापूर्वीच्या साहित्यातून आपल्या अभिजातत्वाचे दाखले देते ती भाषा अभिजातच होती. परंतु, जशी चलनातील नोट एक रुपयाची असो की पाचशेची, त्यावर फक्त गांधीजींचे चित्र असून चालत नाही तर आरबीआयचे लेबल, नोटेचा क्रमांक, गव्हर्नरची सही असं सर्व काही आवश्यक असते. अगदी तसंच मराठी भाषा अभिजात आहे हे सांगणारे सरकारचे आदेश महत्त्वाचे असतात. ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषा अभिजात मराठी असल्याचे आदेश पारित झाले. ज्यामुळे मराठी ही प्राचीन, स्वतंत्र आणि समृद्ध साहित्यिक परंपरा असलेली भाषा ठरली आहे. देशाच्या इतिहासात मराठीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे, साहित्यिक परंपरा स्वतंत्र अन् स्वयंभू आहे, त्याचबरोबर मराठी भाषेचे प्राचीन ते आधुनिक रूप अखंडित आहे. त्यामुळे भारताच्या परंपरेत मराठी अत्यंत महत्त्वाची भाषा मानली जात आहे.

अभिजात मराठी दर्जा मुळे मराठी भाषेचे जागतिक स्तरावर महत्त्व वाढले असून, ती ज्ञान-विज्ञानाची भाषा म्हणून अधिक विकसित होण्यास मदत होणार आहे. परंतु आपल्या मराठी भाषेला जर समृद्धी प्राप्त करून द्यायची असेल तर स्वतःपासून प्रयत्न सुरू झाले पाहिजेत. आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण द्यायचे आणि दुसऱ्यांना मराठीचे महत्त्व सांगायचे अशी दुपटी भूमिका बंद करून मुलांना बदलत्या जगाप्रमाणे शिकवा पण माय मराठीची ओढ लावा, आपल्या मायबोली मराठीमध्ये त्यांना रुची निर्माण होईल असे वातावरण तयार करा..स्वतः मराठीत बोला अन् मराठीचा गजर करा…

……अन्यथा, परदेशात गेलेली काही मुले हळूहळू आपल्या देशाला, जन्मदात्यांना विसरतात तशीच भविष्यात मुले आपलीच मायबोली, आपल्या रूढी परंपरा, संस्कृती विसरतील हे नक्कीच…!

 

✒️दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा