You are currently viewing अथांग मनाच्या सागरातून आलेले काव्यरत्न — कुसुमाग्रज

अथांग मनाच्या सागरातून आलेले काव्यरत्न — कुसुमाग्रज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा दिन” साजरा होतो… त्यानिमीत्ताने त्यांच्या *विशाखा* या काव्यसंग्रहातील कवितांचा वेध घेणारा हा लेख..

 

*अथांग मनाच्या सागरातून आलेले काव्यरत्न — कुसुमाग्रज*

 

विशाखा १९४२ साली प्रसिद्ध झालेला कवितांचा संग्रह. या काव्यसंग्रहातल्या कविता १९३२ ते १९४४ या काळात लिहिल्या गेलेल्या.. इंग्रजी राजसत्तेला दूर हाकलून लावण्यासाठी सळसळणा-या तरूण रक्ताची गर्मी, तीव्रता व्याप वाढीस लागला होता. जागोजागी स्वातंत्र्याची प्रतिके जागी होऊ लागली होती. अंधाराला पारतंत्र्याचे तर सूर्योदयाला स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाऊ लागले

जुन्या लढ्यांशी नव्या लढ्याची तुलना केली जात होती. प्रेरणा घेतल्या जात होत्या आणि जागृतीचे एक साधन ते म्हणजे वर्तमानपत्र.. “विशाखा” चा जन्म हा कुसुमाग्रज “प्रभात” या वृत्तपत्रात कार्यरत असतानाच झाला..

या काव्यसंग्रहातल्या कवितांवर.. त्या वेळच्या ज्वलंत आवेशपूर्ण त्वेषाने भरलेल्या निर्धाराने टणक झालेल्या वातावरणाचा परिणाम दिसून आलेला आहे.. स्फोटक वातावरणाचा ज्वालाग्राही उद्रेक केला तो “गर्जा जयजयकार” या शब्दांनी.. “गर्जा जयजयकार” ही कविता वाचताना आजही त्यातले शब्द आपल्या नसानसात तोच आवेश भरून जातात

देशभक्तांच्या मनातील चीड, त्वेष, निर्धार आणि मातृभूमी प्रेम असं काही व्यक्त झालयं की भारतीय साहित्यात नव्हे तर जागतिक साहित्यात असे प्रखर तेजस्वी क्रांतीसूक्त क्वचितचं असेल नाही का?

सामाजिक सुधारणा, क्रांती यांनीही साहित्यात जागा मिळवली आणि त्याचा प्रभाव कुसुमाग्रजांच्या मनावर झाला नाहीतर नवलचं.. आणि त्यातून स्वसामर्थ्याची भावना निर्माण झाली आणि ” कोलंबसचे गर्वगीत ” ही कविता लिहिली गेली. त्यांनी सामाजिक जागृतीला जुळतील अश्या अनेक प्रतिकात्मक कविता रचल्या.. त्यात अहि- नकूल, आगगाडी व जमीन, दूर मनो-यात, हिमलाट अश्या कवितांचा प्रामुख्याने समावेश आहे..

पारतंत्र्याच्या काळात सरकारच्या क्रौर्याला उघड नावे ठेवणे धोक्याचे वाटल्यावर त्यांनी वक्रोक्तीचा आधार घेऊन कविता लिहिली ती म्हणजे “अहि- नकूल” … अहि- नकूल ही अप्रतिम कविता… त्यातील अहि म्हणजे नाग हा क्रूर सत्ताधीश तर नकूल म्हणजे मुंगूस..हा त्याला धडा शिकविणारा स्वातंत्र्यसेनानी.. यांचे द्वंद्व या कवितेत अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले आहे. संग्रामातील सगळा त्वेष, आवेग आणि सगळे पेच पवित्रे वाचताना आपण नखशिखांत थरथरून जातो. नागाची चाल, त्याचा दिमाख, त्याचे चापल्य, त्याचे मर्दानी सौंदर्य, त्याचे विध्वंसक सामर्थ्य यांचे हुबेहुब वर्णन करताना कवीने कल्पनांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे… डोळ्यापुढे साक्षात नाग उभा राहतो आणि दोघांचा संग्राम वाचताना तर दोन पिढीजात शत्रूंचे द्वंद्व अंगावर काटा आणतो. मूळातूनच ही कविता वाचायला हवी.. असे मी मनापासून नमूद करीन..

विरोधातही कमालीचे सौंदर्य ” पृथ्वीचे प्रेमगीत ” या कवितेतील काही ओळीतून आपल्याला जाणवते.. त्या ओळी म्हणजे..

!”गमे की, तुझ्या रूद्र रूपात जावे

मिळोनी गळा घालुनिया गळा

तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी

मिठीने तुझ्या, तीव्र व्हाव्या कळ्या”!

सभोवतालच्या जगात मोठ्या संख्येने असलेल्या शापित पिडीत वर्गाला धनिक शोषक कसे भरडून काढतात याचे दुःख कवीच्या मनाला भिडले आणि ” आगगाडी व जमीन ” ही कविता जन्माला आली.. आगगाडी व जमीन या कवितेत “नको गं नको गं आक्रंदे जमीन” असा आक्रोश करणारी जमीन आणि तिच्या अंगावरून धावणारी उन्नत आगगाडी आपल्याला पहिल्या कडव्यात दिसते तर शेवटच्या कडव्यात ” उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती ” अशी गाडीची अवस्था झालेली दिसते…

अश्याच प्रकारचा विरोधाभास “टिळकांच्या पुतळ्याजवळ , स्मृती,

अश्या अनेक कवितांमधून आपल्याला दिसून येतो.. तर भांडवलशाही समाजरचनेत सावकारांच्या टाचेखाली चिरडल्या जाणा-या शेतक-यांचे ह्यदयस्पर्शी चित्रण ” लिलाव” या कवितेत कवीने केले आहे.

कुसुमाग्रजांच्या कविता या केवळ परिस्थितीशी निगडीतच होत्या असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण याच काळात स्वप्नांची समाप्ती सारख्या भावपूर्ण कविता ज्या राजकीय अर्थाची छाया भासवतात की काय असा संभ्रम निर्माण करतात.त्या देखील रचल्या गेल्या.. या संग्रहातील प्रमुख कवितांमध्ये विरोधाचा प्रत्यय दिसून आला आहे..

विरोधातून नाट्य हे सकारात्मकतेकडे नेणे हे जणू कुसुमाग्रजांचे वैशिष्ट्यचं…

त्यांच्या कवितांमध्ये शब्दांना फार परिणामकारक मांडलेले आहे.

“भावपराग उरी थरथरले” हे शब्द जरी नुसते उच्चारले तरी त्या भावनेचा आशय निर्माण होऊ लागतो. तर “भाव दाटले भरारा” हे शब्द वाचकांना गहिवरून टाकण्यात यशस्वी होतात.

उत्कट जीवनानुभव, स्वानुभवापासून ते राष्ट्रप्रेमापर्यंत विषयांचे वैविध्य..

लालित्यपूर्ण आणि ओघवती भाषाशैली अश्या विविध गुणांनी युक्त असणारा विशाखा हा काव्यसंग्रह..

मराठी वाड्.मयातील उच्च कोटीचे वैभव असलेला..

एका कवीने आपल्या भावना तंतोतंत मांडल्याचा आनंद हेच विशाखाचे यश असे मला मनापासून वाटते…

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा