You are currently viewing माघी यात्रा रद्द झाल्यानं वारकरी संतापले.

माघी यात्रा रद्द झाल्यानं वारकरी संतापले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये नियम कडक करण्यात आले आहेत. अशात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 फेब्रुवारीला होणारी माघी यात्राही रद्द करण्यात आली आहे. तर एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरासह दहा गावांमध्ये संचारबंदी  लागू करण्यात आली आहे.

या संचारबंदीला ह. भ. प बंडा तात्या कराडकर यांनी विरोध केला आहे. वारकऱ्यांचा उद्रेक होईल अशी कृती पोलिसांनी करू नये. अन्यथा वारकरी बाहेर पडले तर सरकारांच्या अंगलट येईल, असा थेट इशारा कराडकर यांनी दिला आहे. पंढरपुरात गर्दी होऊ नये यासाठी शहरातील मठ, धर्मशाळांमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांनी मठ रिकामे करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते.

तसेच मठात वारकरी आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. आता यावर वारकरी संप्रदायातून नाराजीची भावना व्यक्त होत आहे.

मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते. राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना प्रचंड गर्दी होते . ती चालते मग वारीलाच विरोध का ? असा सवालही संतप्त वारकऱ्यांनी सरकारला विचारला आहे. माघी यात्रेच्या काळात दोन दिवस श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. माघ दशमी आणि एकादशी म्हणजेच २२ व २३ फेब्रुवारी रोजी दर्शन बंद असणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा