पंचनामा व तात्काळ नुकसानभरपाईची मागणी; कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी / आंबोली :
आंबोली परिसरात गवे, रानडुक्कर तसेच इतर वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य मायकल कोजाम डिसोजा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आंबोली व आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांच्या भात, नाचणी व इतर हंगामी पिकांवर वन्यप्राण्यांकडून वारंवार हल्ले होत आहेत. रात्रीच्या वेळी गवे व रानडुक्कर शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही समस्या अधिक तीव्र बनली असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप नुकसानभरपाईसंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने तात्काळ पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आंबोली परिसरात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून शेती हा उपजीविकेचा मुख्य आधार असल्याने प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता वनविभाग कोणती ठोस पावले उचलतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
