कुडाळ :
मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा ३ या राज्यस्तरीय अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या अभियानाचा उद्देश शाळा परिसर स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बनवणे हा आहे. सदर शाळेने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. शाळेच्या परिसरात आकर्षक भित्तीचित्रे, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, किचन गार्डन तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व प्रेरणादायी संदेश देणारे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.
या यशामागे संस्था व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय गांवकर सर, पर्यवेक्षक श्री. एम. जी. कर्पे सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे एकत्रित प्रयत्न कारणीभूत ठरले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, शिस्त व पर्यावरण संवर्धन याबाबत जागरूकता दाखवत आदर्श निर्माण केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मान. श्री. आपासाहेब गावडे, संस्था सचिव मान. श्री नागेंद्र परब साहेब, उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर साहेब तसेच सर्व संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी शाळेचे कौतुक करून मार्गदर्शन केले असून, शाळेच्या सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
शाळेच्या या यशाबद्दल कुडाळ तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ही कामगिरी इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
