वेंगुर्ला तालुक्यातील बागायतदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन
पीकपाणी नोंदी ऑफलाइन स्वीकारण्यासह शासनाला तातडीचा अहवाल सादर करण्याची मागणी
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बागायती पिके असलेल्या आंबा व काजू हंगामावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे फळधारणेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असून झाडांवर शिल्लक असलेली फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी, जयप्रकाश चमनकर (माजी पंचायत समिती सभापती, वेंगुर्ला), श्री. नितीन मांजरेकर (पंचायत समिती सदस्य, वेंगुर्ला), श्री. संदेश निकम (माजी नगराध्यक्ष, वेंगुर्ला), श्री. प्रकाश बोवलेकर, श्री. श्यामसुंदर राय तसेच वेंगुर्ला तालुक्यातील इतर प्रतिष्ठित व्यापारी व बागायतदार यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात अवकाळी पावसामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. २३ तारखेपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करावी, असेही नमूद करण्यात आले.
तसेच ज्या शेतकऱ्यांची पीकपाणी नोंद ऑनलाइन झालेली नाही, त्यांची ऑफलाइन नोंद त्वरित स्वीकारण्याचे आदेश तलाठ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री महोदयांनाही निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाने या निवेदनाची सकारात्मक दखल घेतल्यास जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
