*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जीर्ण झालेले पान*
झाडाचे पान
आता झाले जीर्ण
पालटला वर्ण
पानाचा…..
अवघे झाड
दिसू लागले पिवळे
पानांचे सोहळे
संपले…..
वारा येताच
टपटप पडते पान
बुंध्याशी मान
टाकत….
झाडाकडे बघत
आठवते ऋतूंची कहाणी
झुललो मनमानी
फांदीसवे……
तिथेच येतील
आता कोवळ्या नवपर्णिका
फुलतील कलिका
फिरून…..
सृजनाचं चक्र
चाले असे अव्याहत
मातीत मिळत
जन्मण्यासाठी…..!!
००००००००००००००🍃🍂
अरुणा दुद्दलवार@✍️
