You are currently viewing सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरचा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत झंझावात

सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरचा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत झंझावात

पणजी येथे झालेल्या १४व्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग स्पर्धेत नववा क्रमांक; आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये ३४ गुणांची वाढ

सावंतवाडी :

सावंतवाडीचा राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने पणजी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या लेफ्टनंट कमांडर कै. गोपाळ सुखटणकर स्मृती १४व्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत नववा क्रमांक पटकावला.

पणजी येथील मुष्टीफंड हायस्कूल पॅरेंट्स-टिचर्स असोसिएशन आणि तिसवाडी तालुका बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यासह विविध राज्यांतील तब्बल २२४ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

बाळकृष्णने नेहमीप्रमाणे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ९ पैकी ७ सामने जिंकून एकूण ७ गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये ३४ गुणांची वाढ केली आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण यश संपादन करत त्याने आपला दबदबा कायम राखला आहे.

स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचे पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर, पूर्वांक कोचरेकर, योगी लेले, चिदानंद रेडकर, लिएंडर पिंटो, अथांग देसाई, स्वरूप राऊळ आणि वेदांत डांगी यांनीही सहभाग नोंदवला.

बाळकृष्णला असोसिएशनचे अध्यक्ष महेश कांदळकर, उद्योजक प्रशांत रेडकर, आंतरराष्ट्रीय पंच अरविंद म्हामळ, दत्ताराम पिंगे, अग्नि आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

गेल्या दहा वर्षांपासून मुक्ताई ॲकेडमीचे शेकडो विद्यार्थी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश संपादन करत आहेत. ॲकेडमीचे बहुतांश विद्यार्थी आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू असून त्यांना अध्यक्ष व प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

बाळकृष्णसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा