*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*साडी*
लग्न मंडपात तिचं आगमन झालं आणि एकंदरच प्रचंड धांदल, गडबड, गप्पा, भेटीगाठी, आनंद असलेल्या वातावरणातल्या सर्वांच्या नजरा तिच्याकडे अक्षरशः खिळून राहिल्या. अगदी काही क्षणांसाठी जणू काही सारंच ठप्प झाल्यासारखं वाटलं. तिच्या अंगाअंगावरून एक पेशवाई सौंदर्य झिरपत होतं. सुंदर, जांभळ्या रंगाची पैठणी तिनं परिधान केली होती. ठसठशीत, उंचापुरा बांधा, गौरवर्ण, डोळ्यातली पिंगट चमक, ओठावर जणू डाळिंब फुटलेलं, कानाच्या रुंद पाळीवर मोत्यांच्या कुड्या, गुबगुबीत गळ्याची शोभा वाढवणारा तो पाणीदार मोत्यांचा माणकं आणि पाचूने जडवलेला दोन पदरी तन्मणी, हातात शिंदेशाही तोडे, दंडात बाजूबंद, नाकात नथीचा साज, उंच कपाळावरची हलकेच टेकवलेली चंद्रकोर, मानेवरच्या अंबाड्यात खोवलेलं सुवर्णफुल, हा सारा मनमोहक नेत्रसुखी साज मिरवत ती हसतमुखाने सर्वांना भेटत बोलत अगदी सहजपणे मिसळूनही गेली. मी तिच्याजवळ गेले आणि न राहवून तिला म्हणाले, “किती सुंदर दिसतेस गं! तुझ्याकडे पहातच राहावंसं वाटतंय. शिवाय तुला असं पाहण्याची सवयच नाही ना त्यामुळे मी तर प्रथमदर्शनी तुला ओळखलंच नाही.पण मस्त.”
“खरं म्हणतेस का गं? पण मी आज ठरवलंच होतं बिनाच्या लग्नात अगदी पारंपरिक पैठणी आणि तसाच शृंगार करून जायचं. सवय नसल्यामुळे थोडसं अवघडल्यासारखं वाटतंय पण गंमतही वाटते. खूप भारी वाटतंय. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे महत्त्व आणि एक समृद्ध वारसा जपण्यासाठी मी इतकी सारी धडपड केलीय”
खरंय.
साडी हे केवळ वस्त्र नव्हे तर ती एक संस्कृती आहे. समृद्ध वारसा आहे. काळ बदलतोय, जीवन पद्धती बदलतेय, स्त्रियांचं आयुष्यातलं स्थानच सर्वार्थाने बदलत आहे, तिच्या भूमिका बदलत आहेत शिवाय ग्लोबलायझेशनमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढत आहे. त्यातच वस्त्र संस्कृतीही बदलत चालली आहे. अधिक सोयीची म्हणून पाश्चात्य देशातली पोशाख संस्कृती महिलांच्यात बळावू लागली आहे. अर्थात साडी ऐवजी पंजाबी पद्धतीची सलवार- कमीसही प्रचलित झाली आहे. साडी नामशेष झाली नाही पण ती फक्त निमित्तापुरती उरली आहे. सण, लग्न समारंभ, हळदीकुंकू, पूजाअर्चा वगैरे पुरतीच मर्यादित राहिली आहे. बदल होणारच आणि काळाप्रमाणे घडत असलेले हे बदल दुराग्रहाने रोखण्यापेक्षा ते स्वीकारणे हे योग्यच आहे पण असे जरी असले तरी भारतीय महिलेच्या मनातून साडीचे महत्त्व अजूनही तितकंच त्याच प्रमाणात प्रभावीपणे टिकून आहे यात वादच नाही.
महाराष्ट्रातल्या पैठणीसह, बनारसी, कांजीवरम, कलमकारी, मधुबनी,बांधणी, माहेश्वरी, चंदेरी, म्हैसुरी, गढवाल, पटौला आणि अशा विविध प्रकारच्या साड्या आपल्या कपाटात असाव्यात आणि कधीतरी का होईना दिमाखदारपणे त्या देहावर मिरवाव्यात ही हौस महिलांना आजही तितकीच भारी आहे.
साड्या नेसण्याचे प्रकारही अनेक आहेत. बंगाली, गुजराती, दाक्षिणी, केरळी, कुणाचा उलटा पदर तर कुणाच्या वेगळ्या निर्या. या सर्वांमध्ये सौंदर्य आहेच पण साडीचं खरं सौंदर्य जे खुलतं ते महाराष्ट्रीय पद्धतीने नेसण्यातच. आता लुप्त होत गेलेली नऊवारी काष्ट्याची साडीही किती बहारदार! हौसेखातर आजही महिला तशी नऊवारी साडी आवर्जून नेसतात. ती रेडीमेड असो अथवा पारंपरिक पद्धतीने नेसलेली अथवा कुणा जाणकार व्यक्तीकडून नेसवलेली असो तिचा तोरा आहेच. ऐतिहासिक काळात रणांगणात लढणाऱ्या रणरागिणी घोडेस्वारीसाठी सुलभ म्हणून नऊवारी काष्ट्याची साडी नेसायच्या.
रवीवर्माच्या चित्रात रेखाटलेली नऊवारी साडीतली सात्विकता आणि काहीशी मादकता दर्शवणारी स्त्री पाहताना आजही डोळ्याचं पारणं फिटतं.
माझं स्वतःचं साडीशी असलेलं नातं मात्र फारच रम्य आहे. शालेय जीवनात पाच सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त आम्ही साऱ्या विद्यार्थिनी त्या एका दिवसापुरता साडी नेसून ठुमकत जायचो, त्यासाठी आठवडाभर आधीच आईच्या पाठी तिची चांगली साडी नेसायला देण्यासाठी केलेली मस्काबाजी पण गमतीदार असायची आणि त्यावेळी सावरताही येत नसलेल्या साडीत शिक्षिकेची भूमिका छोट्या वर्गांसाठी पार पाडताना अक्षरशा तारांबळ उडायची. शाळेत होणाऱ्या श्रावणी शुक्रवारच्या हळदी कुंकवाच्या दिवशीसुद्धा आम्ही साऱ्या मुली साड्या नेसून हजर असायचो. खूपच गंमत वाटायची तेव्हा!
परकर पोलका, फ्रॉक्स, स्कर्ट ब्लाऊज या वस्त्र प्रकारांना ओलांडून वयानुसार मी आणि आमच्या पिढीतल्या सर्वच जणी साडी कधी आणि कशी सराईतपणे नेसू लागलो हे कळलेही नाही. त्यावेळी कधीतरी कॉलेजमध्ये येताना कुणा सुषमा नावाच्या मुलीने सलवार-कमीस घातली तर ओठावर हात ठेवून “अय्या!” व्हायचं अर्थात आमच्या कॉलेजमध्ये तसा बहु जातीय मिश्रित विद्यार्थीनी समूह होता. पण तद्दन मराठी ग्रुप मध्ये साडी म्हणजे साडीच. प्रत्येक घरोघरीची ती परंपरा होती. साधारण मला वाटते माझ्या वयाच्या पन्नाशीपर्यंत तरी सर्वत्र मी आणि माझ्या पिढीतल्या सर्वजणी साड्याच नेसत मग त्यात रोजच्या, विशेष कार्यक्रमाच्या, लग्न समारंभाच्या वगैरे अशी विभागणी असायची पण सुरुवातीला बिचकत, संकोचत आणि नंतर बिनधास्तपणे ,”आणि त्यात काय आक्षेपार्ह आहे” असे प्रश्न टाकत अत्यंत सोयीचा म्हणून पंजाबी पोशाखाचं वेड अंगात कसं भिनलं ते आठवत नाही पण ते अत्यंत सोपं, सुलभ म्हणून स्वीकारलं गेलं आणि कपाटातल्या साड्या हँगरवर बिच्चाऱ्या होवून नकळत लोंबकळत राहिल्या पण यातही एक गंमत सांगते.
माझ्या आईने आम्हा बहिणींना साडी शिवाय कुठल्याही वस्त्रात आनंदाने स्वीकारले नाही. तिचे ठोकताळेच असायचे. नाटकाला जायचं म्हणजे साडी नेसूनच जायचं. हा तिचा फंडा. तिने कित्येक वेळा मलाच नव्हे तर आम्हा बहिणींना छान तयार झालेले असतानाही कपडे बदलून साडी नेसायला भाग पडलेलं आहे.
आता आईचाही धाक उरला नाही पण तिची आठवण आणि साडी नेसण्याचा तिचा आग्रह मात्र मनाच्या कोपऱ्यात आजही अस्तित्वात आहेच.
आता साडी बद्दल,” एक सांस्कृतिक समृद्धीचा वारसा” म्हणून जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हाच एक प्रकारे अबोलपणे एक कबुली देतो की वस्त्र संस्कृती बदलली आहे. साडी नेसण्यातून मिळणारी सकारात्मकता, शरीराचे तापमान राखण्यातली मदत, सौंदर्य, कलात्मकता, सभ्यता, शालीनता, सात्विकता. या सगळ्या गुणात्मकतेच्या पलीकडे जाऊन कधीतरी, नैमित्तिक, रितीनुसार म्हणून साडी.. बाकी रोजच्या धावपळीसाठी, धकाधकीसाठी, सुरक्षिततेसाठी सहज सोपे म्हणून भारतीय परंपरेतला अंगभर झाकणारा सलवार-कमीस अथवा तत्सम वेस्टर्न आउटफिट तेही साडीला मनातल्या मनात हळूच “सॉरी म्हणत!हे सर्वमान्य झाले आहे.
मात्र आजही एखाद्या तथाकथित काॅन्झर्वेटीव्ह कुटुंबातील प्रौढ स्त्री अमेरिकेतल्या मुलांना भेटायला जाताना जीन्स अँड टॉपमध्ये विमानतळावर,ODD PERSON OUT दिसते तेव्हा मनात येतेच” जशी मातृभाषा तसा साडी मातृपोशाख सोडून का हे असं स्वत:चं ध्यान करून घ्यायचं?”
उत्तर एकच: सोय, सुटसुटीतपणा आणि काहीशी अधुनिकता, नव्हे आम्ही सुधारक (पोशाखी) याचे प्रदर्शनही.
पण आजही कला मंदिरमध्ये साड्यांचा सेल लागला की आपले पाय नकळत त्या दुकानाच्या रस्त्यावर वळताच की नाही…
संस्कृती मिटत नाही हेच खरे!
*राधिका भांडारकर*
