मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारे आणि कवी–रसिक संवाद अधिक व्यापक करणारे मराठी साहित्य व कला सेवा यांचे सलग २५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:३० ते ७:३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४ येथे संपन्न होणार आहे.
या ऐतिहासिक कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मा. सौ. मंजिरी मराठे (सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका तथा विश्वस्त — स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक) विराजमान राहणार आहेत. काव्य, कला आणि विचार यांच्या माध्यमातून समाजमन समृद्ध करणाऱ्या या उपक्रमाने रसिक आणि कवी यांच्यातील संवाद अधिक दृढ केला असून, नवोदित कवींना संधी देताना अनुभवी साहित्यिकांच्या लेखणीला सन्मान देण्याची परंपरा सातत्याने जपली जात आहे.
या कविसंमेलनाची सत्ररचना तीन भागांत करण्यात आली आहे. पहिल्या सत्रात मुक्त विषयावर स्वरचित कवितांचे सादरीकरण होणार आहे. दुसऱ्या सत्रात चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू) यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन करण्यात येणार आहे. तिसऱ्या सत्रात कवी महेश भिकाजी बंडबे लिखित ‘मयावळी’ (चारोळी संग्रह) या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष मा. सौ. मंजिरी मराठे यांच्या शुभहस्ते होणार असून, त्यानंतर मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत होईल.
काव्यसादरीकरणासोबत प्रभावी अभिवाचनालाही विशेष स्थान देण्यात आले आहे. जास्तीत जास्त ५ अभिवाचकांना संधी दिली जाणार असून, अभिवाचनासाठी आरती प्रभू यांच्या साहित्यकृतीतील निवडक भाग सादर करावयाचा आहे. प्रत्येक सहभागीला एक स्वरचित कविता आणि एक आरती प्रभू यांची कविता सादर करता येणार असून, प्रत्येक सादरीकरणासाठी ३ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. गीत, गेय किंवा संगीतबद्ध सादरीकरणास परवानगी नसणार आहे.
सहभाग इच्छुकांनी १ मार्च २०२६ पर्यंत स्वरचित कविता, पाच ओळींचा साहित्यिक परिचय आणि अभिवाचनासाठी निवडलेल्या साहित्यकृतीची माहिती व्हॉट्सॲपवर पाठवावी, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. साहित्यिक गुणवत्ता, आशय, भाषा आणि सादरीकरणक्षमता यांच्या आधारे निवड करण्यात येणार असून, प्रथम आलेल्या आणि दर्जेदार २० कवींना संधी दिली जाईल. कार्यक्रमानंतर सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक व अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व व्हॉट्सॲप समूहासाठी गुरुदत्त वाकदेकर – ९९८७७४६७७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.
