You are currently viewing सरला शिशिर

सरला शिशिर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*सरला शिशिर*

 

पौषाची थंडी हवीहवीशी आणि माघाचा गारठा बोचरा , अंगावर शिरशिरी आणणारा, गोधडीतूनबाहेर येऊच नये असं वाटणारा . दिवस जरा लहान पटापट अंधारणारा,ऊन्हात तर काहीच दम नसणारा, , ऊशीरा ऊजाडणारा, लवकर संध्याकाळ होणारा शिशिर निरोप घेऊ लागला.

शुष्क झाडांना हळूहळू गुलाबी पालवी दिसायला लागली.पांगारा कांटेसावर, फुलायला लागले.

गुलाबी सुंदर कमळासारखी फूलं लेऊन निष्पर्ण काटेसावर ऊभी राहिली कि, ओळखावं चालला शिशिर … येणार वसंत.

आकाश निळसर, पांढूरकं, कापूसमेघ घेऊन सजायला लागलं.ऊषेची लाली अधिकच पसरू लागली तर संध्या लालगुलाबी रंगात हंसू लाजू लागली.

आम्रवृक्षावर मोहर बहरला आणि इवलूशा बाळकैर्या खेळू लागल्या.

शाली, स्वेटर, गोधड्या धुऊन ऊघड्यावर वाळत पडल्या. शेकोट्या विझल्या. शेकोटी भोवतीच्या कोंडाळ्याचा गप्पा संपल्या.

फणस, पपया, अननस, आंबा चिकू आपली छोटी बाळं अंगाखांद्यावर खेळवत आपले लेकूरवाळेपण कौतुकाने मिरवू लागल्या.

अंगणे तयार होऊ लागली. मांडव पडू लागले. खाटा, झोपाळा रांगोळी यांनी अंगणे नटू लागली.

फाल्गुन लागला. आता गावोगावी होलाष्टक सुरू होईल. होळीच्या आधी आठ दिवस होलिकामातेची छान गाणी गातात. यात छान चुरस, चढाओढ असते. यालाच होलाष्टक म्हणतात.

समोरचे झुडूप बघा मोगरीच्या कळ्यांनी लगडलंय. आता जाई जुई, अनंत, तगर, चाफा, सोनटक्का कर्दळी सारी फुलझाडं डवरून येतील. वेण्या, गजरे, फूलदाण्या, देवघरं सजतील.

शिशिर सरला आता होळी पेटेल. जून्या वस्तू, कपडे, जूने वाद तंटे भांडणे होळीत बोंबा मारत नष्ट करतील. जूने टाकूनी वसंतातील नव्यासाठी तयारी करतील. मागचं विसरून नवे स्विकारतील. रंग ऊधळतील. नवं धान्य .. ऊस, कापूस, गहू, हळद, भूईमूग बटाटा,ज्वारी हरभरा यात सोने‌ पिकलंय.

कापणी होईल

गुर्हाळे चालू होतील. नवा गुळ, हरभरा डाळ येईल.

पुरणपोळीचा देवाला नैवेद्य देऊन बळीराजा कृतज्ञता व्यक्त करेल.

एकदा थोडी जाणवेल इतपत थंडी आपल्याला भेटून निरोप घेईल.

शिशिर सरून वसंताचा रंगोत्सव रंगेल.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा