You are currently viewing चार दिवसांच्या महास्वच्छता अभियानाचा उद्या समारोप
Oplus_16908288

चार दिवसांच्या महास्वच्छता अभियानाचा उद्या समारोप

‘मिशन क्लीन सावंतवाडी’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शिवउद्यान ते मोती तलाव येथे सांगता

सावंतवाडी :

स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीत सुरू असलेल्या ‘मिशन क्लीन सावंतवाडी’ या महास्वच्छता अभियानाचा उद्या समारोप होत आहे. शिवउद्यान ते ऐतिहासिक मोती तलाव परिसरात या मोहिमेची सांगता होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहराच्या सौंदर्यात भर घालावी, असे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी केले आहे.

गेल्या चार दिवसांत नगरपरिषदेची यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुख्य रस्त्यांसह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बसस्थानक तसेच शासकीय कार्यालयांच्या परिसराची विशेष साफसफाई करण्यात आली. सांडपाणी नाल्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा हटविण्यावर विशेष भर देण्यात आला.

या अभियानाला नागरिक, युवक व विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वतः प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी ठिकठिकाणी उपस्थित राहून नियोजनासह प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने मोहीम प्रभावी ठरली.

“स्वच्छता ही केवळ काही दिवसांची मोहीम नसून ती प्रत्येकाची दैनंदिन जबाबदारी आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सावंतवाडीला सुंदर व आरोग्यदायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे,” असे सांगत निरवडेकर यांनी नागरिकांनी प्लास्टिकमुक्त व कचरामुक्त शहरासाठी संकल्प करावा, असे आवाहन केले.

स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असून, कचरा व्यवस्थापनात नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा