पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर घोषणाबाजी; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा सहभाग
सावंतवाडी :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत सावंतवाडीत शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन केले. जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधानांवर करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला.
अमेरिका-भारत व्यापार करार तसेच पंतप्रधान मोदींबाबत वापरण्यात आलेल्या कथित अपशब्दांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले.
श्री. परब म्हणाले की, भारत-अमेरिका व्यापार करार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच वापरण्यात आलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे.
येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानासमोर शिवसेनेच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पुतळा जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, लतिका सिंग, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, रियाज खान यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
