You are currently viewing कणकवलीचे ‘मराठा सांस्कृतिक भवन’ वर्षभरात पूर्ण करणार – नाम. नितेश राणे
Oplus_16908288

कणकवलीचे ‘मराठा सांस्कृतिक भवन’ वर्षभरात पूर्ण करणार – नाम. नितेश राणे

८ कोटींच्या निधीतून शहराच्या वैभवात भर; पुढील वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनाची ग्वाही

सांस्कृतिक भवनासाठी टप्प्याटप्प्याने अतिरिक्त निधी देणार; ‘राणेंचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी’

कणकवली :

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत कणकवली शहरात भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. जिल्हा नियोजन समितीमार्फत या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी बोलताना नाम. नितेश राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारे पारदर्शक आणि गतीमान प्रशासन देणे हे आमचे कर्तव्य आहे. कणकवलीकरांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. पुढील वर्षी १९ फेब्रुवारी २०२७ रोजी याच दिवशी या भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, या भवनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या सांस्कृतिक चळवळीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. कला, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारी ही वास्तू सर्वांसाठी खुली असेल. ही वास्तू अधिक दर्जेदार व्हावी यासाठी आवश्यक तेवढा अतिरिक्त निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाईल.

“मी मराठा समाजाला शब्द दिला होता की तुमच्या हक्काचे सांस्कृतिक भवन उभे करेन. राणे कुटुंबाचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळी असते, तो कधीही चुकत नाही. पुढील वर्षी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्या उपस्थितीत या वास्तूचे दिमाखात उद्घाटन होईल,” असा ठाम विश्वास नाम. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

शब्दाला जागणारे सरकार

“आमचे सरकार शब्दाला जागणारे आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी समाजबांधवांनी हक्काच्या वास्तूची मागणी केली होती. आज ती पूर्ण करताना अभिमान वाटतो. आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

इतिहासाची जपवणूक आणि गतीमान प्रशासन

शिवरायांच्या स्वराज्याच्या आदर्शावर चालत पारदर्शक व गतीमान प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी आणि सर्व यंत्रणांनी हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी आपण सदैव तत्पर राहू, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री नाम. नितेश राणे यांना अश्वारूढ शिवप्रतिमा, शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘अक्षरसिंधू कलामंच’तर्फेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, एस.टी. सावंत, अर्जुन राणे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक तसेच मराठा समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा