सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी भव्य आरोग्य शिबिरे आयोजित होणार
तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढत जिल्ह्यातच विशेष उपचार सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांतील त्रुटी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गोवा (बांबोळी) येथे जावे लागू नये, यासाठी आता दर तीन महिन्यांनी भव्य आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.
या वेळी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अनंत डवंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे-इंगवले तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील उपस्थित होते.
नाम. नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेक गंभीर रुग्णांना तातडीने गोवा (बांबोळी) येथे हलवावे लागते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी दर तीन महिन्यांनी नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांना जिल्ह्यात बोलावून मोफत तपासणी व औषधोपचार सुविधा देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यमान यंत्रणेवर ताण वाढला आहे. आगामी बजेट अधिवेशनात हा मुद्दा ठळकपणे मांडून टप्प्याटप्प्याने रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असेही नाम. नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
गरीब आणि गरजू रुग्णांना या उपक्रमातून मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवेतील त्रुटींवर थेट दखल घेत दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेतली जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
शासकीय आरोग्य यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
