*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*शेजार*
लक्ष्मीने( माझी कामवाली बाई) मला अगदी आग्रहाने तिच्या घरी साईबाबांच्या भंडाऱ्याला येण्याचे आमंत्रण दिले होते. ती मला असंही म्हणाली होती की माझ्या येण्या जाण्याची सर्व व्यवस्था ती करणार होती. इतक्या प्रेमाने दिलेले आमंत्रण मी टाळूच शकत नव्हते.
भंडार्याच्या कार्यक्रमासाठी मी तिच्या घरी पोहोचले. दुतर्फा घरे असलेली ती बैठी चाळ. लक्ष्मीच्या घरचा कार्यक्रम म्हणजे त्या संपूर्ण चाळीचाच उत्सव वाटला मला. पूजा जरी लक्ष्मीच्या घरी झाली तरी जेवणाच्या पंगती चाळीतल्या सर्व घरातून उठत होत्या. चाळीतल्या सर्व स्त्रिया अगदी छान दाग- दागिने घालून चांगल्या साड्या नेसून येणाऱ्या पाहुण्यांची ऊठ बस जातिने बघत होत्या. त्या क्षणी मला जाणवले, हा खरा शेजार! आपल्या एवढ्याशा जागेत कसे होणार? हा प्रश्नच नव्हता लक्ष्मीला. त्यावेळी ती संपूर्ण वास्तूच लक्ष्मीची होती जशी.
मला ही भावनाच फार आवडली. मनातल्या मनात तुलना झाली, की आपण अगदी सुसज्ज अशा ब्लॉक मध्ये राहतो, पण तरीसुद्धा काही करायचे म्हटले की जागा अपुरीच पडते.
एकेकाळी दादर मुंबईत चाळ संस्कृती होती, चाळीत राहणारे प्रत्येक कुटुंब अगदी आनंदी दिसायचे. शेजारच्या घरात लग्न असो, साखरपुडा असो, अगदी मुलगी बघण्याचा कार्यक्रम का असेना, त्यावेळी तो कार्यक्रम त्या चाळीत राहणाऱ्या प्रत्येक घरातील असायचा. सगळ्या घरांची दारे सतत उघडी. हं! कधी वादावादी, भांडणे झालीच तरी ती तेवढ्यापुरती.
आता ही संस्कृती बदलली. चाळी जमीन दोस्त झाल्या, त्या जागी ३०/४० मजली टॉवर उभे राहिले. सर्व कुटुंबे आपल्या बंद ब्लॉक मध्ये व्यस्त! शेजारच्या घरात काय चालले आहे, कुणी आजारी झाले, अगदी मृत्यू झाला तरी फार उशिरा कळते. आमच्या शेजारी कोण राहत आहे इतके माहीत असले तरी खूप झाले. शेजारची माणसं भेटणार ती येता जाता कधी लिफ्टमध्ये नाहीतर बाहेर.
आम्ही स्वतःच्या नवीन घरात जाण्यापूर्वी भाड्याने एका लहानशा घरात राहत होतो. सेल्फ कन्टेन्ट ब्लॉक असला तरी एका ओळीत चाळीप्रमाणे दिसणारी ती घरे होती. आमच्या शेजारी श्री. व सौ. प्रधान आणि प्रधानांची आई असे एक त्रिकोणी कुटुंब राहावयास आले. एक दिवस मुलगा आणि सून कामावर गेल्यावर त्या आईने माझ्या घराचा दरवाजा ठोठावला. त्या ओळख करून घेण्यासाठी आल्या होत्या. पहिल्याच भेटीत त्या मला म्हणाल्या, ” अरुणा, मी कुठेही गेले, तरी प्रथम एक शेजार पक्का करून ठेवते. कारण प्रथम मदतीला धावणारे शेजारीच असतात.”
खरोखरच त्या प्रधान आजी म्हणजे नंतर माझ्याही घराचा एक भागच बनल्या. एखाद दिवशी त्या आल्या नाहीत की मी बेचैन होऊ लागले, लगेच त्या बर्या आहेत ना हे जाऊन पाहू लागले. त्यांच्यात आणि आम्हा दोघात काहीतरी एक अदृश्य बॉण्ड तयार झाला. त्यांच्याकडून मी अनेक चांगल्या गोष्टी शिकले सुद्धा.
माझ्या मते शेजार/ शेजारीण हा प्रत्येक कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे. मग तो शेजार निंदकाचा का असेना!
*मॅन इज अ सोशल ऍनिमल* हे पहिले वाक्य मी सोशिऑलॉजी या विषयाचा अभ्यास करताना शिकले. समाजात वावरत असताना शेजारी हा फार महत्त्वाचा घटक आहे. राहण्यासाठी जर घर शोधत असलो तर घराबरोबरच आपले पहिले प्राधान्य असते ते आजूबाजूच्या परिसराला, शेजारी कोण आहेत? कसे आहेत? याला.
आता बंदिस्त ब्लॉक मध्ये राहण्याची संस्कृती असली, तरी रहिवाशांची एक सोसायटी असते. शहरी जीवन इतके धावपळीचे झाले आहे, की नाही आपण भेटू शकत रोजच्या रोज आपल्या शेजाऱ्यांना, परंतु यासाठीच सोसायटीत गणपती उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, न्यू इयर, स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन असे सामूहिक सण- उत्सव साजरे केले जातात. बऱ्याचशा महिला नोकरदार वर्गातील असल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे हळदीकुंकवासारखे कार्यक्रम करणे शक्य होत नाही, परंतु सोसायटीतील काही स्त्रिया एकत्र येऊन सुट्टीच्या दिवशी असे समारंभ घडवून आणतात.
थोडक्यात काय? आपल्या समवेत राहणाऱ्या शेजाऱ्यांना भेटावे, परस्परांशी परिचय वाढावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी ही प्रत्येकच माणसाची मानसिकता असते. कुठेतरी लांब टेकडीवर कोणीही माणूस आपले स्वतःचे घर बांधून एकटा कधीही राहणार नाही.
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन
