बांदा
शेर्ले सावरी जवळील भोवाण्डो भागातील काजू, नारळ बागेसह गवताच्या गंजीला आग लागून सुमारे 30 ते 35 हजारांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत येथे काम करत असलेल्या महिला घाबरल्या. त्यांनी आगीची खबर स्थानिकांना दिली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत अरुण बाबलो राऊळ, शशिकांत बाबलो राऊळ व देवानंद गोपाळ राऊळ यांच्या बागेतील काजू कलमे, नारळाची रोपे व दोन गवताच्या गंज्या जळून खाक झाल्या. याबाबत राऊळ यांनी तात्काळ बांदा येथील वीज कार्यालयाला फोनवर माहिती दिली. बांदा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंते श्री. आपटेकर घटनास्थळी दाखल झाले. एकंदरीत घटनेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्याकडून पंचनामा करून आपल्या कार्यालयाला द्या, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी शेर्ले सरपंच जगन्नाथ धुरी, पोलिसपाटील विश्राम जाधव, वायरमन नाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.