वेंगुर्ले येथे आंबा बागायतदार शेतकरी व व्यापारी (करारधारक व्यापारी) यांची उद्या एकत्रित बैठक
आंबा नुकसानी विषयावर चर्चा करून ठरविणार पुढील दिशा
वेंगुर्ले
सद्या होत असलेल्या आंबा नुकसानी या विषयावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व आंबा बागायतदार शेतकरी व व्यापारी ( करारधारक व्यापारी) यांची एकत्रित बैठक बुधवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक वेंगुर्ले शाखा येथे आयोजित केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. अति थंडी, अति उष्णता असल्यामुळे आंबा फळे गळून पडून नुकसान होत आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या नुकसानीमुळे आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. यावर ठोस निर्णय घेण्यासाठी सर्व बागायतदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. याबाबत आज वेंगुर्ले येथील रामेश्वर ट्रान्सपोर्ट येथे आंबा उत्पादकांची बैठक होऊन उद्याच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, रामेश्वर ट्रान्सपोर्ट चे जनार्दन पडवळ, आंबा बागायतदार जगन्नाथ सावंत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय, नगरसेवक संदेश निकम, दाजी परब, प्रीतम सावंत, सुधीर पालेकर, यशवंत उर्फ बाळू परब, अजित राऊळ, विष्णू उर्फ दादा गावडे यांच्यासह अंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. दरम्यान तालुक्यातील जास्तीत जास्त अंबा उत्पादक शेतकरी बागायतदार यांनी उद्याच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, श्यामसुंदर राय, जनार्दन पडवळ, जगन्नाथ सावंत यांनी केले आहे.
