You are currently viewing देवस्वारीच्या पवित्र तीर्थस्थानाने कुणकेश्वर यात्रेची उत्साहात सांगता

देवस्वारीच्या पवित्र तीर्थस्थानाने कुणकेश्वर यात्रेची उत्साहात सांगता

देवस्वारीच्या पवित्र तीर्थस्थानाने कुणकेश्वर यात्रेची उत्साहात सांगता

देवगड (प्रतिनिधी)

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा १५ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न झाली. यावर्षी कुणकेश्वर भेटीसाठी एकूण ४ देवस्वाऱ्या आल्या होत्या त्यामधील कणकवली तालुक्यातील जाणवली व नागवे अशा दोन तर देवगड तालुक्यातील नारीग्रे मधील एक व मालवण मधील मालोंड एक अशा एकूण चार देवस्वाऱ्यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी उशिरा या सर्व देवस्वाऱ्या कुणकेश्वर मध्ये दाखल झाल्या. देवस्वारी बरोबर गावातील रयत ही मोठ्या प्रमाणात कुणकेश्वर मध्ये आली होती.

सोमवार सायंकाळी सोमवती अमावस्येला प्रारंभ झाला. अमावस्या असल्याने समुद्रात देखील उधान आले होते. उंच उंच लाटा उडत होत्या. मात्र देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाच्या सतर्कता बाळगत समुद्रात कोणालाही जाऊ दिले नव्हते. मात्र अचानक खवळलेला समुद्र त्यात वाढलेल्या लाटांमुळे किनारपट्टी भागात थाटलेल्या व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले.या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे येथील चौपाटीवरील वाळू बरेच वेळा बाजूला हटविण्यात आली होती. यामुळे तिथे थाटलेल्या व्यापारी वर्गाला प्रथमच याचा मोठा फटका बसला.सिंधुदुर्ग पोलीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, तहसीलदार रमेश पवार,देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ हे कुणकेश्वर येथे उपस्थित होते.शासन, प्रशासन,देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी व स्वयंसेवक,या ठिकाणी आपल्या भाविक भक्तांना समुद्राच्या पाण्यात सकाळी पाच वाजेपर्यंत कोणी उतरू नये अशा सूचना वारंवार तहसीलदार देत होते.

मंगळवारी सकाळी सहा वाजता मालवण तालुक्यातील मालोंड येथील देवस्वारी प्रथम पवित्र तीर्थस्थानासाठी गेली. त्यानंतर कणकवली तालुक्यातील जानवली येथील देवस्वारी तीर्थस्थानासाठी झाली दाखल झाली त्यानंतर नागवे व नंतर नारीग्रे या देवस्वाऱ्याही तीर्थस्थानासाठी समुद्र दाखल झाल्या. देवस्वारी सोबत आलेल्या असंख्य भाविकांनी ,

गावरयतेने समुद्रतीर्थावर पवित्र तीर्थस्थान केले.देवस्वारीच्या पवित्र तीर्थस्थानाने कुणकेश्वर महाशिवरात्र यात्रेची सांगता झाली.

या तीन दिवसाच्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सुमारे पाच लाखापेक्षा जास्त भाविकांनी श्री देव कुणकेश्वर शिवतीर्थावर यात्रा उत्सवास हजेरी लावली होती. व्यापारी वर्गाची उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात यात्रेमध्ये झालेली पाहायला मिळाली. यात्रा उत्सवासाठी सहकार्य करणारे सर्व व्यापारी वर्गांचे,एसटी प्रशासन,पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन,आरोग्य यंत्रणा, देवगड कॉलेज स्वयंसेवक, इतर सर्व मंडळीनी हा यात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा