पुणे :
कोरा चेक आणि केवड्याचे पान (गझल संग्रह) या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा १५ फेब्रुवारी २०२६ रविवारी दुपारी ५ ते ८ या वेळेत पुणे येथील उद्यान प्रसाद सभागृहात दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमायाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी माननीय वि. ग. सातपुते (आप्पा) आणि प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री व लेखिका माननीय सौ.राजश्रीताई सोले या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. दीप प्रज्वलना नंतर आनंद या जीवनाचा हे गीत वैशाली काळे सादर केले.
कोरा चेक या कवितासंग्रहाचे उद्घाटन श्री मकरंद घाणेकर आणि केवड्याचे पान या गजल संग्रहाचे प्रकाशन श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांनी केले.
अनेक नामवंत कवी आणि गझलकार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर जेष्ठ आणि आदरणीय गझलकारा लीलाताई देगलूरकर यांनी श्री.कुलकर्णी यांना पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छांचा वर्षाव केला.
‘केवड्याचे पान आहे लेक माझी
कोकिळेचे गान आहे लेक माझी’
असे ज्या लेकी विषयी अनीलकुमार यांनी एका गझलेत म्हटले आहे त्याच त्यांच्या मुलीने कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर गीताने केली आणि लगेचच आपल्या वडिलांचा परिचय अतिशय सुंदर शब्दांत, मोठ्या अभिमानाने व आपल्या दिवंगत आईची आठवण काढत करून दिला. यामुळे सर्व जण भारावून गेले.
श्री.कुलकर्णी यांनी अतिशय प्रांजळ शब्दांत आपले मनोगत व्यक्त करताना अती आनंद किंवा टोकाचे दुःख असेल तर मनातून आपसूक कविता बाहेर पडते असे सांगितले. आपण ज्या शासकीय नोकरीत होतो तिथे साहित्याशी आपला दूरान्वयानेही कधीच संबंध आला नाही. पण नंतर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आपण कवितेचा आधार घेतला असे सांगितले. पुण्यात आल्यावर श्री.मकरंद घाणेकर आणि श्री.प्रफुल्ल कुलकर्णी यांनी आपल्या कवितेवर संस्कार केल्याने ती निर्दोष झाली अशी कबुली देखील दिली.
श्री.घाणेकर यांनी कुलकर्णी यांच्या कवितेत जी गझल लपली होती ती फक्त आपण वेगळी केल्याचे सांगितले. श्री.प्रफुल्ल कुलकर्णी यांनी अनीलकुमार हे देगलूर गावचे सुपुत्र असल्याने त्यांची कविता इतकी परिणामकारक आहे हे नजरेस आणून दिले. हिंदी, कानडी, तेलगू, मराठी, अशा विविध भाषा राज्यांच्या सीमेवर वसलेल्या देगलूर गावात बोलल्या जातात. त्यामुळे भाषेच्या संदर्भात अनीलकुमार यांची समज अधिक समृद्ध आहे असे मत व्यक्त केले. मा.राजश्री सोले यांनी कविता आणि गझल संग्रह एकाच वेळी प्रकाशित करून श्री कुलकर्णी यांनी कविता श्रेष्ठ का गझल हा वादच मिटवून टाकला असे सांगत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणात भावकवी वि.ग.सातपुते यांनी कवीची प्रतिभा ही ईश्वरीय देणगी आहे. सारस्वतीची साधना असून ती केली पाहिजे असे आपल्या वक्तव्यातून सोदाहरण स्पष्ट केले. कवीने भरपूर वाचन, मनन, चिंतन करून व्यक्त झाले पाहिजे.बतरच येणारे शब्द हे अतिशय सुंदर, प्रभावी आणि नादमय असतील असेही सांगितले. शेवटी श्री. अनिल कुलकर्णी यांना ‘लिहीत रहा’ असा सल्ला देत दीर्घायुष्यी आशीर्वाद दिला.
अध्यक्षीय भाषणानंतर वैशाली काळे यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांचे , रसिकांचे आभार मानले.
नंतर अनिल कुलकर्णींच्या दोन्ही पुस्तकातील पाच कविता आणि पाच गजल यांचे माननीय ज्येष्ठ गझलकार सुधीर कुबेर, जयश्री श्रीखंडे, वैशाली काळे, मनीषा साने, वंदना घाणेकर आणि अनिल कुलकर्णी यांनी सादरीकरण केले.
प्रकाशन समारंभाच्या सूत्रसंचालनाचे काम मनीषा साने यांनी उत्कृष्टपणे केले..
