You are currently viewing शिक्षणक्षेत्रातील मौलिकता मलिन होते आहे का ?
Oplus_16908288

शिक्षणक्षेत्रातील मौलिकता मलिन होते आहे का ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*शिक्षणक्षेत्रातील मौलिकता मलिन होते आहे का ?*

 

अर्थात होतेच आहे, झाली आहे, अगदी बट्ट्याबोळ झालाय् म्हटले तरी चालेल इतकी ती

घसरली आहे.आमच्या काळातल्या गोष्टी नंतर

सांगेन. सध्या काय चालले आहे ते सांगते. याला

जबाबदार कोण? ते आपणच ठरवा.

 

१)गेली अनेक वर्षे आमच्याकडे काम करतो त्या

सुताराच्या मुलाची गोष्ट. १० वी कसाबसा पास

झाला. ११ वी सायन्सला ॲडमिशन घेतली. पठ्ठ्या वर्षभर कॅालेजला गेलाच नाही. बाप आपला कामात मग्न. वर्षाच्या शेवटी आईशी संगनमत करून दीडलाख रूपये भरून कुणा, कुठल्या कॅालेजचे नकली सर्टीफिकेट बापाच्या

गळ्यात मारले. पैसे लंपास झाल्याचे लक्षात येताच बापाचे धाबे दणाणले. नंतरही बापाला फसवत राहिला. आता बापाला फर्निचरच्या धंद्यात मदत करतो.

 

दुसरा किस्सा. एकाला बीसीएस कोर्सला ॲडमिशन पाहिजे होती. सहज मला म्हणाला,

मॅडम, काय करावे समजत नाही. साठ हजार ते

एक लाख रूपये मागतात ॲडमिशन साठी. मी

म्हणाले,” मी घेऊन देऊ का तुम्हाला ॲडमिशन”? तो माझ्याकडे बघतच राहिला.मी रिटायर होऊन बरीच वर्षे झाली

आहेत. एके काळचे माझे कलिगच प्राचार्य होते.

मी फक्त एक फोन केला. अशा अशा माणसाला

बीसीएसच्या ॲडमिशनसाठी पाठवते आहे व त्याला प्राचार्यांना भेट असे सांगितले. कॅालेजची

रीतसर फी रू. २०.०००/- फक्त भरून त्याने

ॲडमिशन घेतली.माझ्या एकेका फोनने मी दरवर्षी अनेक गरजूंच्या ॲडमिशन घेऊन देत असे.आता तो मुलगा कमावता झाला आहे. आता विचार करा. ही दोन उदा. काय

सांगतात? ही भ्रष्ट माणसे कोण आहेत? आपलेच नातलग आहेत ना? कि आकाशातून पडलेले कुणी एलियन्स आहेत? नाही ना? मग?

याला जबाबदार कोण? अहो, ह्या भ्रष्टाचाराच्या

रोगाने आम्ही अगदी सडलो आहोत.

 

बाबा आमटे म्हणत, हे भ्रष्टाचारी उंदिर कुणालाच

सुखाने जगू देणार नाहीत. पैसे न खाणाऱ्यांना

शेपटी पकडून अलगद बाहेर फेकतात ते! सारी

यंत्रणाच पोखरली आहे, ठिगळ कुठे कुठे लावणार?

 

आम्ही शिकत होतो तेव्हा अगदी आलबेल होते

असे नाही, पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली

नव्हती. मूल्ये शिल्लक होती. अहो, आता खेडोपाडी पालक पुस्तके, कॅाप्या घेऊन शाळेवर

गर्दी करत मुलांना कॅाप्या पुरवतात व शाळा आपला रिझल्ट चांगला लागावा म्हणून खपवून

घेतात. १९९६ साली मी १२ वी स्कॅाडवर काम करत होते. आमची गाडी शाळेत शिरताच शिपाई

सावधानतेचा इशारा देत असे व बिल्डिंग वरून

कॅाप्यांचा पाऊस पडत असे. आम्ही शिपायांच्या

मदतीने त्याच्या होळ्या पेटवत असू.आम्ही ए टू झेड भ्रष्ट आहोत हो.परिक्षा नि गुण इतपतच

आपली शिक्षण पद्धती सीमित झाली आहे. तिचा

ज्ञानाशी सुतराम संबंध राहिलेला नाही.

 

आम्ही सातवित असतांना आमच्या शाळेत पेपर्सचे गठ्ठेच्या गठ्ठे शाळेत असत व वाळूवर मैदानात अतिशय शिस्तीत आमच्या दर आठवड्याला झालेल्या पोर्शनवर परिक्षा होत

असतं कारण आम्ही ज्ञानार्थी होतो. परिक्षार्थी

नव्हतो. जे शिकवलं ते पचवत होतो, साठवत

होतो नि पुढे पुढे जात होतो. आम्ही फार हुशार

झालो नसू पण खोटारडे नव्हतो, फसवत नव्हतो.

ज्ञानकण घेत होतो. सगळेच घेऊ शकलो नसू

पण त्याच ज्ञानावर इथपर्यंत आलो.

 

कॅालेज लाईफ एन्जॅाय करण्या ऐवजी आम्ही

अगदी लहान वयात १६/१७/१८ त नको तितके वाचले व तेच आजही हृदयात आहे. त्यानंतरही

या वाचनात खंड पडला नाही असे आमच्या जुन्या

शिक्षण प्रणालीने आम्हाला घडवले. धन्य ते

शिक्षक त्यांनाच हे श्रेय द्यावे लागेल.आज नोकरी

मिळवण्यासाठी काय आणि किती पैसे द्यावे

लागतात आपल्याला चांगलेच माहीत आहे. मी तर म्हणेन मलिनता कसली? काळेकुट्ट झालोत

आम्ही.

 

आजचे शिक्षक पहा. माझ्या ओळखीच्या एका गावांच्या शेतावर

आमच्या राखणदाराची बहिण व तिची इ. ९ वीत

शिकणारी मुलगी गवत काढायला आल्या होत्या.

मला तर सवय आहे, काय शिकते? मी विचारलेच. म्हणाली, ९ वीत आहे. मग माझा पुढचा प्रश्न. आजची शाळा? म्हणाली, बंदच केली. का? जवळच्याच आश्रम शाळेत गरीबीमुळे ही मुलगी पालकांनी घातली होती.

ती जे पुढे म्हणाली ते ऐकून माझी बोलतीच

बंद झाली.तिची आई म्हणाली, शाळेतले शिक्षक

या मुलींच्या अंगाला नको तिथे हात लावतात,

म्हणून शाळाच बंद केली. लाज वाटली मला

माणूसपणाची. सेक्स शिवाय जगात दुसरी

गोष्टच नाही का? नि ह्या मुली ह्यांच्या बापाची

मालमत्ता आहे का? मला शक्य असते तर मी

अशा शिक्षकाला लाथेने ठोकरले असते. फाशीच

द्यायला हवी अशा नराधमांना, ती ही जाहिरपणे!

तर असे आहे आपले शिक्षण क्षेत्र. काय होणार

आहे पुढच्या पिढ्यांचे माहित नाही. अहो, पीएचडी करणाऱ्या महिलांकडून शरीरसुखाची

मागणी केली जाते? काय बोलायचे सांगा. माझे

तर नुसते रक्त सळसळते.. पण करणार काय?

ही जमात संघटित आहे हो. यांचे आपापसात साटेलोटे असते. त्यांचे हात ही वरपर्यंत पोहोचलेले असतात. मूल्य म्हणजे काय हेच

ज्यांना माहित नाही त्यांचा मौलिकतेशी काय संबंध?…..

 

ही सारी माझी मते आहेत.

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा