५७ कोटींच्या कामात त्रुटींचा आरोप; नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी काम रोखले
सावंतवाडी :
सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत माठेवाडा परिसरातील सुरू असलेले काम थांबवले.
सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी मेनलाईन जवळपास ५५ वर्षांपेक्षा जुनी असून, वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन योजना राबविण्यात येत आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या योजनेत नरेंद्र डोंगर ते पाळणेकोंड धरण अशी मुख्य पाइपलाईन टाकण्यात येणार आहे. या योजनेमुळे पुढील २५ वर्षांसाठी पाणीपुरवठ्याची सोय होणार असल्याचे सांगितले जाते.
मात्र, खोदकाम योग्य पद्धतीने न होता भुयारी चारही पाइप एकावर एक टाकले जात असल्याचा आरोप सुर्याजी यांनी केला आहे. पाइप वेगवेगळ्या पातळीवर असणे आवश्यक असताना ते एकत्र बसवले जात असल्याने भविष्यात दुरुस्ती आणि देखभाल करताना अडचणी निर्माण होऊ शकतात व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या कामादरम्यान नगरपरिषदेकडील अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर उपस्थित नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रभारी मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे योजनाप्रमुख यांना विचारणा केली असता ते देखील अनभिज्ञ असल्याचे सुर्याजी यांनी नमूद केले.
योग्य तांत्रिक मार्गदर्शनासाठी निवृत्त व अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, अशी मागणी करत पाळणेकोंड धरणापर्यंतची मुख्य पाइपलाईन योग्य पद्धतीने टाकावी, अन्यथा पुढील काम थांबवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अन्यथा ५७ कोटी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
