*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*सेल्फ लव्ह..*
कल्पना छानच आहे. वादच नाही. स्वत:वर प्रेम
करता आले पाहिजे. खरं म्हणाल तर, आमचा
जमाना व त्या पूर्वीचा माझ्या आईचा काळ फार
वेगळा होता.खरं म्हणाल तर, माणूस स्वत:वर प्रेम
करतोच पण आपल्यावरील जबाबदाऱ्यांमुळे व तसे संस्कार असल्यामुळे तो घरातील इतरांवर
जास्त प्रेम करतो. आई वडील भाऊ बहिण यांच्यावर आपले जीवापाड प्रेम असते. त्यामुळे
आमच्या काळात तरी हा विचार मनात कधी आलाच नाही.
एका सरळ रेषेत, सामाजिक दडपणाखाली म्हणा किंवा बाईपणाच्या ओझ्याखालीच आमचे निम्मे
आयुष्य निघून गेले. खाली मान घालूनच चालायचे, डोक्यावरून पदर घ्यायचा, वडीलधाऱ्यांसमोर, शिक्षकांसमोर एकदम जायचे
नाही, बाईची जागा म्हणजे माजघर व स्वयंपाक घर इतपतच सीमीत होती अशा वातावरणात आम्ही वाढलो. खेड्यात तर ही बंधने विशेष असतात. मुलीला, बाईला सतत मागे खेचले जाते.
हे नको, असे नको, तसे नकोचा आमचा जमाना
होता. आजच्या मुलींना जे स्वातंत्र्य आहे त्याच्याशी आमचा सुतराम संबंध नव्हता. मग
सांगा अशा वातावरणात सेल्फ लव्ह ही संकल्पना आमच्या गांवीही नव्हती याचे आश्चर्य
वाटण्याचे कारण नाही. जमानाच तसा होता मग
संस्कारही तसेच झाले.
महिलांचे, मुलींचे जीवन म्हणजे समर्पणासाठीच
असते ही गोष्ट इतकी रूढ झाली आहे की थोड्याफार फरकाने आजही आपण त्या दडपणा
खालीच वावरतो हे सत्य आहे. त्यामुळे स्वत:कडे
लक्ष देण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. आई वडील भाऊ बहिणी व त्यानंतर नवरा
व मुले यांच्यासाठीच जगायचे, त्यांची काळजी
घ्यायची. त्यांना काही कमी पडू द्यायचे नाही,
अशीच जडणघडण महिलांची झाल्यामुळे खुद्द
माझ्या मनातही कधी आला नाही. समर्पण हेच
जीवन बनले. त्यातच सौख्य व आनंद वाटला.
त्याचे कधीही दु:ख वाटले नाही हे आश्चर्य.
त्यामुळे माझ्या पिढीतील महिलांच्या मनात
सेल्फ लव्ह हा विचार क्वचितच आला असावा
किंबहूना आला नसण्याचीच शक्यता जास्त
आहे.
आताच्या मुली पुढारलेल्या आहेत. त्या आता
स्वत:साठी” स्पेस” मागतात, शोधतात. आमच्या
साठी कधीच स्पेस नव्हती व आमच्या मनातही
तो विचार कधी आला नाही इतक्या आम्ही कर्तव्यात गुरफटलेल्या होतो. आता आयुष्याच्या
उतारावर बऱ्यापैकी निवांतपणा असला तरी आता शरीर थकले आहे. मनाला वय नसते हो,
पण शरीराचे तसे नाही. साठीच्या आधीच त्याची
कुरकुर सुरू होते नि मग त्याच्याकडे लक्ष देणे
अपरिहार्य बनते तसे आता चालले आहे.आता स्वत:वर प्रेम करायला भरपूर वेळ आहे पण तशी
इच्छा आता राहिलेली नाही. आपला नित्य क्रम,
थोडीफार कर्तव्ये, जबाबदाऱ्या अजूनही आहेतच.
शेवटपर्यंत त्या सुटत नाहीत हो.
मुलींची पुजा करावी, त्यांना महत्व द्यावे असाही
आमचा जमाना नव्हता त्यामुळे बालपणाचा एक
प्रसंग माझ्यामनावर कायमचा कोरला गेला आहे.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी मुलींची पुजा करावी
अशी रुढी त्याकाळी असावी कदाचित, आता आहे कि नाही मला माहित नाही पण मी लहान
असतांना एका भोगीला आईने मला पाटावर बसवून माझी पुजा केल्याचे आठवते व आज ही
इतके छान वाटते कि जणू मी कोणी महत्वाची
होते. गोड शिरशिरी अंगावर येते. बघा, थोडेही
महत्व मला मिळालेले पाहून तो प्रसंग मनावर
कोरला गेला.मी कोणीतरी खास असल्याचा प्रसंग खूपकाही आनंद देऊन गेला. कारण आम्ही
कधीही महत्वाच्या नव्हतो व आजही नाही आहोत हे कटू सत्य आहे. तेव्हा कुठले सेल्फ लव्ह व कुठली स्पेस हो! इतरांना स्पेस देण्यातच
महिलांचे आयुष्य जाते व त्यालाच सुख समजतात याला मीही अपवाद नाही मंडळी.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
