मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील १९व्या सामन्यात गट ‘ब’ मध्ये झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करून मोठा धक्का दिला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गोलंदाज ब्लेसिंग मुजाराबानी यांच्या घातक माऱ्याच्या जोरावर झिम्बाब्वेने ऐतिहासिक विजय साकारला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १६९ धावा केल्या. ब्रायन बेनेट यांनी नाबाद ६४ धावांची संयमी खेळी करत संघाला भक्कम पाया दिला. त्यांना तडीवानाशे मरुमानी यांनी २१ चेंडूंमध्ये ३५ धावांची आक्रमक साथ दिली. रायन बर्ल यांनी ३० चेंडूंमध्ये ३५ धावा जोडल्या, तर कर्णधार सिकंदर रझा यांनी १३ चेंडूंमध्ये नाबाद २५ धावांची झटपट खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या पाच षटकांतच संघाचे चार फलंदाज तंबूत परतले. जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड आणि कर्णधार ट्रॅव्हिस हेड स्वस्तात बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडला. मॅट रेनशॉ यांनी ४४ चेंडूंमध्ये ६५ धावांची झुंजार खेळी करत झुंज दिली. ग्लेन मॅक्सवेल यांनी ३१ धावांची साथ दिली. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले.
झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजाराबानी यांनी ४ षटकांत १७ धावा देत ४ महत्त्वपूर्ण बळी घेतले. ब्रॅड इव्हान्स यांनी ३.३ षटकांत २३ धावांत ३ बळी मिळवले. त्यांच्या प्रभावी माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव १९.३ षटकांत १४६ धावांत संपुष्टात आला.
या दणदणीत विजयामुळे झिम्बाब्वेने स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीत आपली दावेदारी अधिक भक्कम केली. सामनावीर पुरस्कार ब्लेसिंग मुजाराबानी यांना देण्यात आला. या विजयाने झिम्बाब्वे क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक सुवर्णक्षण नोंदले गेले.
