You are currently viewing मिठी प्रेमाची…उब मायेची

मिठी प्रेमाची…उब मायेची

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”मिठी प्रेमाची…उब मायेची”*

 

 

मिठी प्रेमाची मौनात बोलत

मनातल्या जखमा अलगद भरते,

शब्द अपुरे पडतात जिथे

मायेची उब तिथेच उतरते..

 

थकलेल्या जीवाला विसावा देत

कोसळत्या मनाला सावरते,

अंधारलेल्या वाटेवर अचानक

दीप आशेचा ती उजळते..

 

रुसवे-फुगवे क्षणात मिटवत

नात्यांची वीण घट्ट करते,

अबोल भावनांना नि:शब्दात

ती विश्वासाची भाषा बोलते..

 

आईची माया, स्नेहाची छाया

जगण्याला अर्थ बहाल करते,

मैत्रीची साथ, आपुलकीची हात

नि:स्वार्थी प्रेमाची साक्ष ठरते..

 

दुःखाच्या गर्दीत आधार बनून

एकटेपणाला दूर सारते,

कोणीतरी आहे आपलं म्हणून

जगण्याची उमेद वाढवते..

 

मिठी प्रेमाची…उब मायेची

माणुसकीचा गाभा सांगते,

‘हग डे’च्या निमित्ताने आठवण

प्रेम जपायला मिठीच शिकवते..

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा