कुटुंबाच्या उपस्थितीत दीक्षांत सोहळा उत्साहात; “तुझ्या यशाचा अभिमान” – रवींद्र चव्हाण
मुंबई :
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लेक सलोनी सुहासी रविंद्र चव्हाण हिने एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून डॉक्टर पदवी संपादन केली आहे. नुकताच तिचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.
सलोनी हिने वैद्यकीय शिक्षणातील कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हा मानाचा टप्पा गाठला.
दीक्षांत सोहळ्यावेळी भावूक होत रवींद्र चव्हाण म्हणाले, “तुझा हा दीक्षांत सोहळा सहकुटुंब पाहताना तू रात्र-रात्र जागून केलेला अभ्यास आणि तुझं समर्पण डोळ्यांसमोर उभं राहिलं. तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस आणि आमचा विश्वास सार्थ ठरवलास. तुझ्या या यशाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.”
पुढे बोलताना त्यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, “तुझ्या हातून समाजाची सेवा घडो आणि तुझे यश उत्तरोत्तर वाढत राहो,” अशा भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी सौ. सुहासी चव्हाण, डॉ. सलोनी चव्हाण, खुशी चव्हाण आदी कुटुंबीय उपस्थित होते. सलोनीच्या या उल्लेखनीय यशामुळे चव्हाण कुटुंबात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
