You are currently viewing पान …पिंपळाच .. !

पान …पिंपळाच .. !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पान …पिंपळाच .. !*

 

पान पिवळं पिंपळाच

कातर-कातर व्हायचं

आडून त्याच्या पाहता

हळदीचं रान दिसायचं

….पान पिवळं पिंपळाच..!

 

ऊन अंगी पडताच

दमून थकल्यागत व्हायचं

सावलीला सोडून पळायचं

…..पान पिवळं पिंपळाच ..!

 

कातरवेळी बुंध्याखाली थांबायचं

आडोश्याला स्तब्ध उभं राहायचं

वा-यासंगे नसे त्याला जायचं

…….पान पिवळं पिंपळाच ..!

 

किरणांना अंगावर खेळवायचं

सुरकुत्यांना शेकून घ्यायचं

झिरझिरित होतं दुमडून घ्यायचं

…….पान पिवळं पिंपळाच..!

 

सांजकाळोखांत दुःखानं रडायचं

पेंगत थरथरत झोपायचं

वेड्या जगण्याचा आव आणायचं

……पान पिवळं पिंपळाच ..!

 

भान जगण्याचं भय मरणाचं

ठेवूनच ते जगायचं

रात्री सुर्याची वाट पहातच

ते जागत राहायचं

……पान पिवळं पिंपळाच .!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा