उबाठा उमेदवार उत्तम लोके यांचा पराभव
कणकवली :
नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सावंत यांना एकूण ६३१३ मते मिळाली, तर उबाठा गटाचे उमेदवार उत्तम लोके यांना ११२० मते मिळाली. त्यामुळे सावंत यांनी ५१९३ मतांच्या स्पष्ट फरकाने मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले.
या मतदारसंघात एकूण ७५३० मतांचे मतदान झाले असून, त्यापैकी ९७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत संदेश सावंत यांनी आघाडी घेतल्याने निकालाबाबत कोणतीही शंका राहिली नाही.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. फटाके फोडून आणि एकमेकांना शुभेच्छा देत विजयाचा जल्लोष करण्यात आला. या निकालामुळे नाटळ मतदारसंघात भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
