९ पैकी ७ जागांवर महायुतीचा विजय; शिवसेना ५ तर भाजप २ जागांवर विजयी
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९ मतदारसंघांचे निकाल जाहीर झाले असून महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण ९ जागांपैकी ७ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, यामध्ये शिवसेनेने ५ तर भाजपने २ जागांवर यश संपादन केले आहे. उर्वरित दोन जागांपैकी ठाकरे शिवसेना आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
कुडाळ तालुक्यातील सर्वच मतदारसंघांत काटे की टक्कर पाहायला मिळाली. शिवसेनेने घावनळे मतदारसंघातून केशव ऊर्फ दीपक नारकर, माणगावमधून रुपेश कानडे, पावशीतून तुकाराम ऊर्फ दादा साईल, आंब्रडमधून दीपलक्ष्मी पडते आणि वेताळबांबर्डे मतदारसंघातून नागेश आईर यांना विजयी करत तालुक्यात मोठे यश मिळवले.
भारतीय जनता पक्षाने तेंडोली मतदारसंघातून आरती पाटील आणि ओरोस मतदारसंघातून सुप्रिया वालावलकर यांना विजयी करून दोन जागांवर आपली ताकद दाखवली.
मात्र पिंगुळी मतदारसंघात महायुतीला पराभव पत्करावा लागला असून ठाकरे शिवसेना गटाचे गंगाराम सडवेलकर विजयी झाले आहेत. तसेच नेरूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांनी बाजी मारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एकूणच कुडाळ तालुक्यात महायुतीने ५ (शिवसेना) + २ (भाजप) अशा ७ जागा जिंकत आपला गड कायम राखला असून, निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.
