सिंधुदुर्ग :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरीवर कलम 144 लागू करण्यात आले होते. यावरून भाजप नेते निलेश राणेंनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
शिवनेरीवर सामान्य शिवभक्तांना 144 कलम लागू केले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांचा हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, अशी जोरदार टीका निलेश राणेंनी केली. निलेश राणेंनी शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्यावर शिवजयंती साजरी केली.
यावेळी त्यांन सरकारवर घणाघाती टीका केली.
निलेश राणे म्हणाले की, शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादिचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना साधा हातही लावायला दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागून संभाजी राजे यांनी फरफटत जाऊ नये. उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे.
शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांना द्यायला पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. या सरकारचे शिवाजी महाराजांवरचे प्रेम डुप्लिकेट आहे. इतकी वर्ष होऊनही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी हे सरकार पैसे देऊ शकलेले नाही. शिवरायांबद्दलचे शिवसेनेचे प्रेम हे केवळ दाखविण्यासाठी आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी आहे. हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला केव्हाच लक्षात आलं आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.