*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित “मनगाभारा” काव्यसंग्रहाचे कवी दीपक पटेकर (दीपी) यांनी केलेलं परीक्षण*
*”मनगाभारा”*
🖊️कवयित्री : डॉ.सौ.मानसी पाटील, मुंबई
📞९९८७५४३१५४
मुद्रक: श्री.वि. ग. सातपुते,
प्रकाशन: पद्मजा प्रिंटर्स अँड पब्लिशर्स, धायरी, पुणे
किंमत :₹ २५०/-
मनगाभारा हा कवयित्री डॉ.मानसी पाटील यांचा कवितासंग्रह असून याला ज्येष्ठ कविवर्य माधव उर्फ वि. ग. सातपुते यांची प्रस्तावना लाभली असून जणू कवयित्रींच्या काव्यसंग्रहास परिसस्पर्शच झाला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष कविवर्य राजन लाखे सरांच्या शुभेच्छा शब्दरूपाने प्रकटल्या म्हणजे जणू चंदनाचा परिमळ सर्वत्र पसरल्यासारखेच आहे. या दिग्गज कवी महाशयांच्या जोडीने गझलकार कवी मकरंद घाणेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती कवयित्री सौ.वंदना घाणेकर या पुणेकर द्वयींनी मुक्तहस्ते शुभेच्छांची फुले उधळली आहेत. त्यामुळे नक्कीच काव्यसंग्रह वाचनीय आहे यात शंकाच नाही.
कवयित्री डॉ. सौ. मानसी पाटील, व्यवसायाने डॉक्टर.. विज्ञान शाखेतून शिक्षण… तरीही मराठी साहित्याची आवड जोपासणे म्हणजे दिव्यच असते. कारण, शिक्षणाची पहिली दहा वर्षे वगळली तर उर्वरित सहा सात वर्षे विज्ञानाचा अभ्यास आणि वैद्यकशास्त्रात पारंगत होत असताना कवयित्रींनी मराठी सारख्या व्याकरणाने क्लिष्ट बनलेल्या भाषेची गोडी चिरंतर जोपासली हे देखील वाखाणण्याजोगे आहे.
“मनगाभारा” म्हणजे कवयित्रीच्या अंतर्मनातून किंवा मनाच्या गाभाऱ्यातून साकारलेला एक हुंकार..! गाभारा देवळाचा असो की, राऊळाचा तिथे असते अखंड शांती, अंधार मिटविणारा तेजाळता दीप, अदृश्य लहरी आणि त्यातून उमटणारे असंख्य तरंग. कवयित्रीच्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यातून सात्विक, संवेदनशील शब्दांच्या स्वप्नांचा झुला घेत उमटलेले काव्यतरंग आणि कवयित्री म्हणून असलेलं आपलं अस्तित्व काव्य रसिकांना दाखविण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच स्पृहणीय..!
कविता म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं, पसारा केलेलं उत्स्फुतपणे ओठांवर येणं..!
कविता बाहेरून आत येत नाही तर मनाच्या गाभाऱ्यातून ओठांवर येते, शब्दात प्रसवते. कवीच्या मनात सल असेल तरच अस्सल निर्मिती होते. कवितेचा छंद असून भागत नाही तर तिच्यावर निष्ठा असावी लागते. निष्ठा असेल तरच शब्दांचा, कवितेचा ध्यास लागतो आणि हा ध्यास ज्यावेळी व्रत बनतो ना, त्यावेळीच कवी शब्दांवर स्वार होतो अन् काव्याची निर्मिती होते. “मनगाभारा” या काव्यसंग्रहाच्या कवयित्रीने देखील शब्दांचे व्रत घेऊन अलौकिक अशी काव्य कुमुदे गुंफलेली असल्याचे काव्यसंग्रह वाचल्यावर लक्षात येतं. प्रस्तावनेत विगसा यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच कवयित्रीने मनगाभारा मधून नाजूक, सोज्वळ फुलवात पेटवली आहे.
डॉ.सौ.मानसी पाटील यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे परंतु आद्यदेव गणेशाला वंदन करून सुरू केलेली काव्यमैफील मनाचे कंगोरे उलगडत जाते. मनाच्या बंद दारा आडच्या खोलीत दुसरे कोणीच नसते, आपणच असतो वाट पाहत, कोणी यावं आणि आपल्याशीच आपली भेट घडवून द्यावी.. अशा सुंदर कल्पना कवयित्रीने मांडलेल्या दिसतात.
श्रावण, पाऊस, पहाट, संस्कार शिदोरी, वेगळी दृष्टी, जगण्याचे मर्म, जिद्द, जिव्हाळा, कन्यादिन, काहूर, संत, मुखवटे, तिन्हीसांजा, नामस्मरण, मोक्षमुक्ती, अस्तित्व असे कितीतरी विषय कवयित्रीने या संग्रहातून हाताळलेले असल्याने विविध विषयांवर भाष्य करण्याची संधी आणि विचार वैविध्य यातून पहायला मिळते.
अंधारल्या मनातून काळ हा सरकत आहे…
भर दुपारी पावसाळ्यात ओलीचिंब ही रात आहे..
कवयित्रीने अंधारलेलं मनाची तुलना भर दुपारी आभाळ दाटून आल्यावर ओलीचिंब होणाऱ्या रातीशी करताना वापरलेलं रूपक अतिशय बोलकं वाटतं.
(“शेवाळलेले शब्द”) या कवितेत जेव्हा मनांगण दाटून येतं तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा बरसतात आणि कुणाच्या तरी आश्वासक शब्दांचा सहारा हवासा वाटतो. त्यावेळी तोच तोच बुळबुळीतपणा असणारे शेवाळलेले शब्द नकोसे होतात हे सांगताना कवयित्री म्हणते…,
“वाटतं नको शेवाळलेले शब्द
नाही परिणाम होत मनावर
तोच तोच बुळबुळीतपणा
नसे पुरेसा यायला भानावर..”
तर दुसरीकडे कवयित्री मनातले काहूर मांडताना म्हणते मनातले भाव व्यक्त करायला, गुंतागुंत सोडवायला शब्द सुद्धा तोकडे पडतील..,
“शब्द पडती तोकडे
भाव व्यक्त करावया
पडे संवाद अपुरा
गुंतागुंत सोडवाया..”
मनाच्या गाभाऱ्यातून कवितेकडे पाहताना कवयित्रीने मनाचे विविधांगी कंगोरे अलवार रेखाटले आहेत. बंद दार मनातले, मनातलं संकेतस्थळ, मन हरपून गेले, अशांत मन.. अशा कवितांमधून कवयित्रीने मनातील अनेक गुंतागुंती सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. काळजाची घालमेल थांबविताना,वमनाचा हा गुंता सोडविताना कवयित्री म्हणते…
“दिसतोय एकच उपाय
आता आलं ध्यानात..
आपल्या मनावर ताबा अन्
नको ते विचार ठेवावे म्यानात..”
कवयित्री श्रावणातलं ऊन, कळ्यांची फुले, पहाट, पाऊस, बगळ्यांची माळ, किमयागार अशा अनेक कवितांमधून निसर्गावर भाळलेली असल्याचं दिसून येतं.
(येतो श्रावण)
“नवयुवतीला हिरवा शालू नेसवतो अन्
तिच्यासारखा लाजत लाजत येतो श्रावण..”
असे म्हणत अनेकांच्या मनात रुंजी घालणारा, प्रेम कवितांमधून मनाला गुदगुल्या करणारा नखरेल श्रावण देखील ती लाजरा बुजरा असल्याचं म्हणते आहे.
(कळ्यांची फुले)
“सख्याने दिली ओंजळ, रोमरोमी मोहरुन गेली..
अलवार स्पर्श होता त्याचा, गाली लालिमा पसरून गेली”
सख्याने ओंजळ भरून देताना झालेला अलवार स्पर्शाने रोम रोम मोहरुन जातो अन् गालावर लालिमा पसरते हे वाचताना देखील नजरेसमोर भरलेली ओंजळ, शहारलेलं तन अन् गालावर खुललेली गुलाबाची लाली सारे काही नकळत नजरेसमोर उभं राहतं.
इतर सर्व विषय हाताळताना कवयित्री अध्यात्म, देवधर्म, संत सांगाती, गुरु यांना सुद्धा शेगावीचा राणा, श्रीराम प्रतिष्ठापना, नामस्मरण, संतांची माऊली, अशा रचनांमधून स्मरणात ठेवताना दिसते आहे.
(शेगावीचा राणा)
“तूच दावी मार्ग आता, अज्ञानाच्या अंधारात
शेगावीच्या राणा तूची, वसशी अंतरात..||”
असे म्हणताना कवयित्री अज्ञानाच्या अंधारात शेगावचा राणा गजानन महाराज मार्ग दाखवतील असा गाढा विश्वास व्यक्त करते आहे.
(संत…)
“प्राजक्ताला रिक्तपनाची ना कसली असे खंत
निखळ आनंद देणारा भासतो मजला संत”
या कवितेत रात्रभर सुगंध पसरवून आसमंत गंधीत करणारा प्राजक्त सकाळी आपली सफेद भगवे वस्त्र नेसलेली फुले धरणीवर सांडून रिक्त होतो. त्या रितेपणाची त्याला कसलीही खंत नसते हे सांगताना प्राजक्ताला कवयित्रीने संतांची उपमा दिली आहे कारण, जगाला आयुष्य कसे जगावे हे शिकवताना भगव्या वस्त्राशिवाय आपल्यापाशी काहीही शिल्लक न ठेवणारे संत देखील निस्वार्थपणे सर्वस्व समाजासाठी दान करतात त्यांचे श्रेष्ठत्व दाखविले आहे.
कवयित्रीने काही सामाजिक विषय देखील हाताळले आहेत. यात शिक्षणाची ओढ, जलसंवर्धन सारख्या रचनेमधून..
“आण घेऊ चला सारे, थांबवू या हा विसर्ग..
आणू कृतीतून आता, सारे वाचवू निसर्ग..
असे म्हणत निसर्ग वाचविण्याचा बहुमोल संदेश दिला आहे.
अस्तित्वाची लढाई, आयुष्याचे सोने, आयुष्याची भूमिती, प्रवृत्ती आणि निवृत्ती, लपंडाव सुखदुःखाचा, संसाराचा घडा, वेगळी दृष्टी अशा काही काव्यरचनांमधून कवयित्रीने आयुष्य कसे जगावे… यावर खोलवर प्रकाश टाकलेला आहे, आयुष्याचे गणित सोडविण्यासाठी वेगळी दृष्टी आवश्यक असल्याचे संबोधित केले आहे.
कवयित्रीने संपूर्ण काव्यसंग्रहात कवितेची उंची सांभाळली आहे, अनावश्यक मुक्तच्छंद दीर्घ काव्य न लिहिता काव्याची लांबी सुद्धा मोजकीच ठेवल्याने कविता वाचताना, समजून घेताना कठीण जात नाही किंवा रटाळपणा वाटत नाही. परंतु, तरीही एक सुचवावं वाटतं की, कवितासंग्रह हा मोजक्याच आवडीच्या कवितांचा असावा (आपलं अपत्य प्रत्येकालाच प्रिय असतं म्हणा) म्हणजे १०८ कविता आणि १३८+मुखपृष्ठ, मलपृष्ठ इत्यादी पाने म्हणजे आकार फार मोठा वाटतो.
एखाद दुसऱ्या ठिकाणी कवितेतील लय बिघडताना दिसते आहे जसे की, उदा….
(अस्तित्वाची लढाई)
हयात गेली तरी अजूनही, तडजोडीवर जगते आहे..
खांदे दुखले ओझे वाहून, मुकाट्याने भार वाहत आहे..
मुक्तच्छंद रचनांमध्ये देखील लय, ताल बिघडू नये.
इथे..
“खांदे दुखले ओझे वाहून, भार मुक्याने वाहते आहे”
(पहाट)
नाजूक कोवळ्या कळ्यांना फुलविते ती पहाट…
पक्ष्यांना दिगंतरी झेप घेण्या लावते ती पहाट..
….या द्वीपदी मध्ये
“पक्ष्यांना दिगंतरी झेप घेण्या लाविते ती पहाट..”
असे छोटे छोटे बदल केले असते तर लय आणखी चांगली आली असती.
एकंदर कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील यांच्या मनाचा गाभारा असलेला “मनगाभारा” हा काव्यसंग्रह विविधांगी कवितांची मेजवानी आहे. जरूर शब्दप्रेमी, वाचनप्रेमी, साहित्य प्रेमींनी शब्दरूपी शारदेचं हे रूप न्याहाळावं, प्रतिक्रिया, प्रतिसाद द्यावा अन् कवयित्रीला पुढील लेखनासाठी आशीर्वाद द्यावेत…
डॉ.सौ.मानसी पाटील यांच्या शब्दसाधनेसाठी खूप खूप शुभेच्छा…
🖊️ दीपक परशुराम पटेकर (दीपी)
अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद,
सावंतवाडी, सिंधुदुर्ग.
८४४६७४३१९६
