गझल सप्ताहातील शेवटचा लेख
कविश्रेष्ठ सुरेश भटांना घराघरात पोहोचविणारे दोन महानुभाव
सुधाकर कदम आणि भीमराव पांचाळे
अमरावती येथे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाला अमरावतीच्या मोर्शी रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये प्रारंभ झाला असून दिनांक आठ ला सायंकाळी या अखिल भारतीय एल्गार गझल संमेलनाचा समारोप होणार आहे. समारोप जरी होत असला तरी या अखिल भारतीय एल्गार संमेलनामध्ये सहभागी झालेले गझलकार गीतकार रसिक गायक हा गजलेचा संदेश आपापल्या गावात आपापल्या परिसरात घेऊन जाणार आहेत.
आजची परिस्थिती वेगळी आहे. सोशल मीडिया बराच प्रभावी झालेला आहे. नियतकालिके पण भरपूर निघालेली आहेत आणि ते सर्व प्रकारच्या साहित्याला स्थान देत आहेत. पण सुरेश भटांचा जो काळ होता त्या काळात ही परिस्थिती नव्हती. सोशल मीडिया तर नव्हताच .पण आज जसे गजलांचे भरपूर कार्यक्रम होतात .भरपूर संमेलने होतात
त्या प्रमाणात त्या काळात होत नव्हती. सुरेश भट लिहीत होते
स्वतः सादर करीत होते. पण त्यांच्या गजलांनाना कवितांना गीतांना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे पहिले काम जर कोणी केले असेल तर त्या माणसाचे नाव आहे सुधाकर कदम. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या या माणसाने सुरेश भटांची गझल हृदयापासून गाऊन त्याचे वेगवेगळे कार्यक्रम करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन त्यांना सुप्रसिद्ध लेखक डॉ नरेंद्र जाधव व सिने दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते गजलगंधर्व हा सन्मान बहाल करण्यात आला. आज गझल नवाज भीमराव पांचाळे सुरेश भटानंतर हे काम करीत आहेत. श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांचा वारसा पुढे चालविला आहे .एवढेच नव्हे तर ज्याप्रमाणे सुरेश भट यांनी एक पिढी निर्माण केली त्याचप्रमाणे या दोघांनी पिढी निर्माण करण्याचे काम केले आहे.
सुधाकर कदम यांचे आर्णी हे तसे लहान गाव. तालुक्याचे गाव
यवतमाळ जिल्ह्यातील गाव. पण या माणसाचे संगीतावर व गायनावर अफाट प्रेम होते .त्या प्रेमाची सुरुवात जरी आर्केस्ट्रा पासून झाली असली तरी त्यांना जेव्हा खरा सूर गवसला तेव्हा कविवर्य सुरेश भटांचा स्पर्श त्यांना झाला व ते भटांचे गजलांचे कवितांचे गीतांचे भक्त झाले. सुधाकररावांचे आणि भट साहेबांचे नाते जवळचे होते. एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. तासंतास सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या .पण संगीताचे आणि गायनाचे विषय रात्र रात्रभर जागून काढत होते आणि त्यामुळे सुधाकरराव कदम यांनी सुरेश भटांच्या ज्या ओळी लोकांसमोर सादर केल्या त्या लोकांनी उचलून धरल्या डोक्यावर घेतल्या .
सुधाकर कदम यांना सुरेश भट महाराष्ट्राचे मेहंदी हसन म्हणायचे. इतकी त्यांच्या शब्दात व स्वरात प्रगल्भता होती. पण ती त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नव्हती .त्यासाठी त्यांना भरपूर परिश्रम करावे लागले. भरपूर रियाज करावे लागले. तो रियाज ते परिश्रम त्यांनी आपल्या स्वरामध्ये आणि सुरामध्ये अतरविले. त्यामुळे सुधाकर कदम यांनी सुरेश भटांच्या गीतांना गजलांना कवितांना खऱ्या अर्थाने न्याय दिला. तसे सुद्धा सुधाकर कदम हे आर्णीला संगीत विषयाचे अध्यापक होते
पत्रकारिताही करीत होते. अभिनय ही करीत होते . वाद्य वाजविणे हा तर त्यांचा छंदच होता.एका अर्थाने त्या काळात सुधाकर कदम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मराठी गझल कशी गावी हे शिकावे ते सुधाकर कदम यांच्याकडूनच. सुरेश भट आणि यशवंत देव त्यांना पहिले गझल गायक म्हणून संबोधित होते आणि ते खरेही होते. कारण सुरेश भटांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेले आहे
साधीसुधी ही माणसे
माझ्या कवितेची धनी
सुधाकर कदम हे साधे सरळ ग्रामीण भागात राहणारे व्यक्तिमत्व होते .त्यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांच्या काव्यावर प्रेम केले आणि ते आपल्या स्वरांच्या आणि सुरांच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केले .अर्थातच ते लोकांना आवडले. त्याला कारणही तसेच होते .आजच्यासारखा व्यावसायिक रंग त्या काळात शिरलेला नव्हता. कवी गायक आणि रसिक त्यांचे एक अतूट नाते होते.
आज सुधाकर कदम यांनी वयाची 75 वी गाठलेली आहे. तरीपण त्याच जोमाने त्याच अंत:करणाने ते सुरेश भटांचे आपल्या शब्दात सुरातून गुणगान करीत असतात हे त्यांचे मोठेपण आहे. गझल संमेलनाने त्यांचा मानसन्मान केला आहे. आणि ते त्याला पात्रही आहेत.
भीमराव पांचाळे
सुधाकर कदमानंतर सुरेश भटांच्या संपर्कात आले ते भीमराव पांचाळे. भीमराव पांचाळे यांनी सुरेश भटांना सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपल्या शब्दांमध्ये आपल्या स्वरांमध्ये आपल्या सुरांमध्ये प्राण ओतले. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या लहानशा ग्रामीण भागात राहणारे हे व्यक्तिमत्व. पण आपल्या गझल गायनाने त्यांनी पूर्ण विश्व व्यापले आहे. गझलनवाज या उपाधीने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांची गझल पेश करण्याची अदा आगळीवेगळी आहे. ते शब्दाची फेक इतक्या सुंदर रीतीने करतात की ती रसिकांच्या काळजात जाऊन बसते. सुरेश भटानंतर गजलेचा वारसा चालविणारे गायन करून लोकांसमोर पेश करणारे जे काही लोक आहेत त्यामध्ये भीमराव पांचाळे यांचे नाव सर्वपरिचित आहे. ठिकठिकाणी गझल संमेलन घेऊन गजलांच्या कार्यशाळा घेऊन त्यांनी सुरेश भट यांच्या गझल उपक्रमाला खतपाणी घातले आहे. आज ठिकठिकाणी गझल संमेलने कवी संमेलने नवीन नवीन गझलकार लोकांसमोर यावया लागलेले आहेत. काही काही गझलकार तर इतके दमदार आहेत की ते समोरच्या रसिकांवर मोहिनी करून जातात. अशा पिढीला विचारपीठ उपलब्ध करून देणे
त्यांना मार्गदर्शन करणे .या कामात भीमरावांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे आणि ते महत्त्वाचे आहे.
सुरेश भटांनी ज्याप्रमाणे स्वतःपुरते मर्यादित न राहता इतरांनाही प्रोत्साहन दिले गजलेची बाराखडी तयार केली. ती अनेकांना पाठविली. अनेकांच्या गजला दुरुस्त करून दिल्या .त्यांना प्रोत्साहन दिले. तेच काम आज श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम करीत आहेत. मंगेशकर परिवारातील आशा भोसले लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर या लोकांनी सुप्रसिद्ध गायक श्री सुरेश वाडकर यांनी श्री सुरेश भट यांना घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न तर केलाच आहे .पण त्याचबरोबर सुधाकर कदम आणि भीमराव पांचाळे यांनी केलेले प्रयत्न हे घराघरापर्यंत सुरेश भट यांना प्रत्यक्ष घेऊन गेलेले आहेत.
आता बरेच गायक कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या गजलांचे कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे शब्दसुरांच्या झुल्यावरचे श्री सुरेश शुक्ल दत्तप्रसाद रानडे गझलरत्न प्रा. राजेश उमाळे आमच्या अमरावतीचे श्री सुरेश दंडे पुण्याचे प्रा. डॉ. चंद्रकिरण घाटे अशी बरीच मंडळी सुरेश भटांचा कित्ता गिरवीत आहेत. आमच्या अमरावतीकरांसाठी ही गौरवाची बाब आहे. कारण की सुरेश भट हे अमरावतीचे होते आणि दि. सात आणि आठ फेब्रुवारीचे हे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनही अमरावतीत होत आहे .त्यानिमित्त आमच्या अमरावतीच्या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आणि महाराष्ट्र बाहेरही हे गझलकार हे गीतकार हे आपापल्या परीने सुरेश भटांना न्याय देत आहेत .हे निश्चितच मैलाचा दगड ठरणारे आहे. या सर्वांना माझा गझल संमेलनानिमित्त मानाचा मुजरा.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती
9890967003
