You are currently viewing जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्या दोन तासांत १०.६४ टक्के मतदान; देवगड तालुक्यात सर्वाधिक, मालवणमध्ये सर्वात कमी टक्का

 

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील एकूण ८१० मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया शांततेत सुरू असून पहिल्या दोन तासांत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत झालेल्या पहिल्या टप्प्यात ५९ हजार ७३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी १०.६४ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे.

या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ४२ जागांसाठी ११५ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ८३ जागांसाठी २४४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील ५ लाख ६१ हजार १०५ मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार देवगड तालुक्यात सर्वाधिक ११.५३ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ वैभववाडी तालुक्यात ११.३० टक्के, कणकवलीत ११.१८ टक्के आणि सावंतवाडीत ११.११ टक्के मतदान नोंदवले गेले आहे.

दुसरीकडे दोडामार्ग तालुक्यात ९.९४ टक्के, वेंगुर्ला तालुक्यात ९.९८ टक्के, तर मालवण तालुक्यात सर्वात कमी ९.२९ टक्के मतदान झाले आहे.

सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्याचे चित्र दिसून आले असून, दिवसभरात मतदानाचा हा टक्का वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा