११.३० पर्यंत एकूण २५.७२ टक्के मतदान; वैभववाडीत सर्वाधिक, दोडामार्गात सर्वात कमी मतदान
सिंधुदुर्गनगरी :
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजता जिल्ह्यातील ८१० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या ४२ जागांसाठी ११५ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ८३ जागांसाठी २४४ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी जिल्ह्यातील ५ लाख ६१ हजार १०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सकाळी ९.३० ते ११.३० या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण २५.७२ टक्के मतदान नोंदवले गेले. या कालावधीत १ लाख ४४ हजार ३३३ मतदारांनी मतदान केले. केवळ या दोन तासांत ४४ हजार ६०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तालुकानिहाय पाहता वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १८.२६ टक्के मतदान झाले, तर दोडामार्ग तालुक्यात सर्वात कमी १२.९४ टक्के मतदान नोंदवले गेले.
इतर तालुक्यांतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे —
कणकवली : १६.४३ टक्के
सावंतवाडी : १५.४५ टक्के
वेंगुर्ला : १४.६३ टक्के
मालवण : १४.३४ टक्के
कुडाळ : १३.६८ टक्के
सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू असून पुढील टप्प्यांत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
