आंगणेवाडीतील जत्रोत्सव शिस्तबद्ध, भाविकाभिमुख; दर्शनासाठी ९ रांगा, व्यापक सुरक्षा व्यवस्था
छोटू आंगणे यांची पत्रकार परिषदेत माहिती
मालवण :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव यंदा अत्यंत शिस्तबद्ध आणि भाविकाभिमुख पद्धतीने साजरा होणार आहे. “सर्वसामान्य भाविक हाच आमचा केंद्रबिंदू असून भाविकांना लवकरात लवकर आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी ग्रामस्थ आणि आंगणेवाडी विकास मंडळाने कंबर कसली आहे,” अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंगणेवाडी श्री देवी भराडी मंदिर परिसरात पत्रकार परिषद झाली. यावेळी सचिव काका आंगणे, कार्यवाह बाळा आंगणे, स्थानिक ग्रामस्थ बाबू आंगणे यांसह आंगणेवाडी विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा दर्शनासाठी एकूण ९ रांगा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कणकवलीच्या बाजूने येणाऱ्यांसाठी २ आणि मालवणच्या बाजूने येणाऱ्यांसाठी २ अशा ४ प्रमुख रांगा असतील. मंत्री महोदय आणि विशेष पाहुण्यांसाठी स्वतंत्र रांग असेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची गर्दी विचारात घेऊन त्यांच्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
दिव्यांग भाविकांसाठी कणकवली आणि मालवण दोन्ही बाजूंनी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवक त्यांना दर्शन घडवून पुन्हा वाहनापर्यंत सोडण्याची जबाबदारी पार पाडतील.
यात्रेची सुरुवात ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजल्यापासून होईल. पहिल्या दिवशी रात्री ९ ते १ या वेळेत धार्मिक विधी आणि महाप्रसादासाठी दर्शन बंद राहील. या काळात भाविकांनी रांगेत न थांबता यात्रा परिसरात फिरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रात्री १ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन अखंडित सुरू राहील.
यात्रेच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. यात पंढरपूर १००, मुंबई आणि स्थानिक भागातील सुमारे ६०० ते ७०० स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी १५ विशेष बाऊन्सरची नियुक्ती केली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनास दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद यांनी स्वतः येऊन नियोजनाचा आढावा घेतला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ९ टँकरची सोय करण्यात आली आहे.
महावितरणतर्फे अतिरिक्त वीज खांब आणि पथदिवे सुविधेसाठी विशेष पोल उभारले आहेत. एसटी महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले असून मालवण आणि कणकवली अशा दोन स्वतंत्र संस्थांकडे पार्किंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुकानदार आणि रिक्षा व्यावसायिकांचे आर्थिक हित जपण्यासाठी त्यांना योग्य जागा आणि पार्किंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा यात्रोत्सव ‘प्लास्टिकमुक्त’ साजरा केला जाणार आहे. तसेच यात्रेच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण परिसरात विशेष कचरा निर्मूलन मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला जाईल, असेही छोटू आंगणे यांनी स्पष्ट केले.
