रमेश निर्गुण यांच्या पाठिंब्याने न्हावेलीतील राजकीय चित्र स्पष्ट
सावंतवाडी :
न्हावेली पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला असून, अपक्ष उमेदवारी दाखल केलेले रमेश निर्गुण यांनी अखेर निवडणूक रिंगणातून माघार घेत भाजपचे अधिकृत उमेदवार अष्टविनायक धाऊसकर यांना पाठिंबा दर्शवला आहे आहे. पक्षाच्या हितासाठी आणि विकासाच्या प्रवाहासाठी मी हा निर्णय घेत असल्याचे श्री निर्गुण यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या निर्णयामुळे न्हावेली परिसरात भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या संदर्भात बोलताना सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी रमेश निर्गुण यांच्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. निरवडेकर म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांना जपणारा आणि त्यांना मोठे करणारा पक्ष आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली, हे याचेच जिवंत उदाहरण आहे. निर्गुण यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ पक्षहिताचा विचार करून आपला पाठिंबा अष्टविनायक धाऊसकर यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचे आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो.
रमेश निर्गुण यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, त्यांनी पंचायत समितीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काही कारणांमुळे ती मिळू शकली नाही. तरीही भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या शब्दाचा मान राखून आपण उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पाठीशी असलेली सर्व मते आणि कार्यकर्त्यांची शक्ती आपण अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी लावणार असून, भाजपच्या विजयासाठी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
भाजपचे अधिकृत उमेदवार अष्टविनायक धाऊसकर यांनी रमेश निर्गुण यांचे आभार मानताना सांगितले की, न्हावेलीचा सरपंच म्हणून काम करताना मी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. आता निर्गुण यांच्या पाठिंब्यामुळे आमची ताकद द्विगुणीत झाली आहे. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, विरोधक सध्या गोंधळलेले आहेत. दोन वर्षांत विकास झाला नाही असे म्हणणारे विरोधक आता विकास झाला आहे असेही मान्य करू लागले आहेत, त्यामुळे त्यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी.
या राजकीय घडामोडी दरम्यान न्हावेली गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गावाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, हीच विकासाची नांदी असल्याचे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले. या सभेला भाजपचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
