अमरावती येथे कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या नगरीत यंदाचे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन संपन्न होत आहे. अमरावतीच्या मोर्शी रोडवरील भव्य अशा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये सात व आठ फेब्रुवारीला संपन्न होणाऱ्या या संमेलनानिमित्त आयोजित गझल सप्ताहातील हा लेख. या लेखात कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांचा जीवन प्रवास व लेखन प्रवास रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
कविवर्य श्री सुरेश भट यांचा जन्म अमरावतीचा .1932 सालच्या एप्रिल महिन्यातील 15 तारीख ही त्यांची जन्मतारीख. संपूर्ण महाराष्ट्रातला परिचित असलेल्या व आपल्या गजलेने गझलेचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या या कवीचे शिक्षण अमरावती येथे बी.ए.पर्यंत झाले. 1964 मध्ये पुष्पा मेहंदळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. गौरी चित्तरंजन व हर्षवर्धन ही त्यांचे तीन अपत्ये. अमरावतीच्या बडनेरा रोडवरील गोपाल नगर परिसरातील भटवाडीमध्ये सुरेश भटांचे परंपरागत घर आजही आहे.
1967 मध्ये कवी श्री सुरेश भटांनी जाहीर काव्य गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.
त्यांचे कार्यक्रम जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच कर्नाटकातील बेळगाव येथे संपन्न झालेले आहेत. त्यांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम नागपूरच्या धनवटे रंगमंदिरात अमरावतीच्या नगर वाचनालयात
मुंबईच्या श्री शिवाजी रंगमंदिरात कोल्हापूरच्या संगीतसूर्य श्री केशवराव भोसले नाट्यगृहात संपन्न झाले आहेत.
त्यांचा पहिला कवितासंग्रह रूपगंधा हा 15 मार्च 1961 रोजी प्रकाशित झाला आहे .हा संग्रह त्यांनी आपले जिवलग मित्र अमरावतीचे श्री रामदास भाई श्राफ अमरावती यांना अर्पण केला आहे. त्यानंतर त्यांचा गाजलेला रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह मार्च 1974 ला लोकाभिमुख झाला. एल्गार हा संग्रह डिसेंबर1983 मध्ये लोकांसमोर आला .1994 साली झंजावात हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला .
24 जुलै 2000 रोजी सप्तरंग हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी सुरेश भटांच्या निवडक कविता या कवितासंग्रहात प्रकाशित केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील कवींना प्रोत्साहन मिळावे म्हणून कविवर्य सुरेश भट यांनी 1990 साली काफला हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित केला. त्यामध्ये आज गाजत असलेल्या अनेक कवींच्या गझलांचा समावेश आहे. एखाद्या महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या असामान्य कवीने समकालीन कवींना गजलकारांना प्रोत्साहित करण्यासाठी केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
कवी श्री सुरेश भट यांना वेगवेगळे मानसन्मान प्राप्त झालेले आहेत. हे पुरस्कार जरी वस्तुनिष्ठ असले तरी जनसामान्यांच्या हृदयामध्ये त्यांनी तेव्हाही स्थान मिळविले होते आणि आताही त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या गजलेच्या रूपाने कवितेच्या रूपाने ते स्थान कायम आहे.
त्यांच्या रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाने केशवसुत पारितोषिक देऊन गौरविले आहे. तसेच साहित्याच्या क्षेत्रात नावाजलेला सोलापूरचा भैरूरतन दम्मानी हा मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे .याशिवाय मराठी उर्दू अकादमीचा पुरस्कार देऊनही त्यांना गौरविण्यात आले आहे .
सुरेश भटांनी काही चित्रपटांसाठी गीते लिहिली तर त्यांच्या गीतांचा वापर काही निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये केला व आजही करीत आहेत. 1) चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली हलकेच चांदण्याला जाग आली 2) उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली 3). केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली 4) मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे .मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे 5) सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. तुझेच मी गीत गात आहे .ही त्यांची चित्रपट गीते खूप गाजलेली आहेत. ज्या चित्रपटात ही गाणी आहेत ते चित्रपट देखील त्या त्या काळात गाजलेले आहेत
कविवर्य श्री सुरेश भट यांच्या काळात कॅसेटचा जमाना होता. आजच्यासारखे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. वेगवेगळ्या गायकांनी त्यांच्या आवाजात कविवर्य श्री सुरेश भट यांच्या कविता गजला कविता व गीते स्वरबद्ध करून त्या कॅसेटच्या रूपाने लोकांसमोर आणल्या आहेत. त्यामध्ये सुप्रसिद्ध गायक श्री सुरेश वाडकर त्यांनी अंतरंग व शब्द स्वरांच्या चांदण्यात नावाने २ कॅसेट तयार केलेल्या आहेत तर सुप्रसिद्ध गायिका व सुरेश भट यांच्या निकटवर्ती श्रीमती आशा भोसले यांनी १) येरे घना २)मोगरा फुलला ३) ऋतू हिरवा या नावाने ३ कॅसेट तयार केलेल्या आहेत व त्याला प्रचंड प्रतिसाद त्या काळात मिळालेला आहे. याशिवाय रंजना पेठे यांनी भावधारा नावाने कॅसेट तयार केली असून सुप्रसिद्ध गझल नवाज व आजच्या काळात महाराष्ट्र गाजविणारे सुप्रसिद्ध गजलगायक श्री भीमराव पांचाळे यांनी १)शब्दसुरांची भावयात्रा २) गजल गुंजन ३)पुन्हा तेजाब दुःखांचे हया तीन कॅसेट लोकांसमोर आणल्या .आजही श्री भीमराव पांचाळे श्री सुरेश भट यांना आपल्या गायनातून घराघरात पोहोचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहेत. कविश्रेष्ठ सुरेश भटांचा वारसा ते समर्थपणे चालवित आहेत. त्यांच्याच पुढाकाराने ठिकठिकाणी गझल संमेलने गझल गायनाचे कार्यक्रम तसेच नवीन गझलकारांना प्रोत्साहन प्राप्त होत आहे .
आपल्या गजलेने आपल्या कवितेने आपल्या गीतांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट यांचा मृत्यू 14 मार्च 2003 यादिवशी नागपूरला वझलवार बंगला रामकृष्ण मठाजवळ धंतोली येथे झाला.
सुरेश भटांना खूप काही लिहायचे होते. खूप काही करायचे होते. आकाशगंगा हे आत्मचरित्रपर खंडकाव्य त्यांना लिहायचे होते .त्यातील दोन ओळी त्यांनी मला ऐकविल्या होत्या.
जीवनाची प्रेतयात्रा चालली स्मशानी .
घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी
त्यांच्या आत्मचरित्र लिहिण्यासाठी ते मला वारंवार नागपूरला बोलवित होते .मी जात होतो .पण सुरेश भटांकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची इतकी वर्दळ असायची आणि सुरेश भट प्रत्येकाला तासंतास घेऊन बसायचे. त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यांच्याशी गप्पा मारायचे. त्यामुळे ते काम अपूर्णच राहिले. मला आकाशगंगा पूर्ण करायचे आहे हे ते त्यांचे जिवलग मित्र अरविंद ढवळे डॉ.मोतीलाल राठी दादा इंगळे रामदासभाई श्राफ वली सिद्दिकी यांच्याजवळ बोलले होते. ते देखील त्यांनी हे खंड काव्य लवकर पूर्ण करावे असा आग्रह धरीत होते. पण भटांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे व स्वतः कडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे बरेचसे लेखन करायचे राहून गेले. खरं म्हणजे आज जे त्यांचे साहित्य उपलब्ध आहे त्याचे मूल्यमापन करताना असे वाटते की या कवीच्या नावावर कितीतरी पुस्तके कितीतरी काव्यसंग्रह असायला पाहिजे होती पण भटसाहेबांनी प्रामाणिकपणे आपला वेळ समाजासाठी दिला. नवीन पिढीसाठी दिला. नवीन गझलकारांसाठी दिला. त्यामुळे स्वतःला आणि स्वतःच्या काव्यसंग्रह संख्येला त्यांना न्याय देता आला नाही. पण जे काही मोजके त्यांनी लिहून ठेवले आहे ते त्यांना अजरामर करून गेले आहे एवढे मात्र खरे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
