You are currently viewing माजगांवचा विकासाचा वारसा विक्रांत सावंतांकडेच सुरक्षित : ना. नितेश राणे
Oplus_16908288

माजगांवचा विकासाचा वारसा विक्रांत सावंतांकडेच सुरक्षित : ना. नितेश राणे

पालकमंत्री म्हणून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझीच – नितेश राणे यांची जाहीर ग्वाही

सावंतवाडी :

माजगांव मतदारसंघ हा विकासाची भक्कम परंपरा लाभलेला मतदारसंघ असून, त्या परंपरेला पुढे नेण्याची क्षमता विक्रांत सावंत यांच्यात आहे, असा ठाम विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. “जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेतो,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

सावंतवाडी तालुक्यातील माजगांव जिल्हा परिषद गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रांत सावंत, पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन बिद्रे आणि उत्कर्षा गांवकर यांच्या प्रचारार्थ माजगांव येथील सिद्धिविनायक सभागृहात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

विकासाचा वारसा पुढे नेणारी परंपरा

माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिक्षणमहर्षी कै. विकासभाई सावंत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी माजगांव मतदारसंघात जो विकासाचा ठसा उमटवला, तोच वारसा विक्रांत सावंत पुढे नेतील, असा विश्वास ना. राणे यांनी व्यक्त केला.

“९० टक्के मॅच आधीच जिंकलेली”

रेश्मा सावंत यांच्या कार्याचा गौरव करताना ना. राणे म्हणाले, “जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून त्यांनी जिल्ह्यात विकासाची जी घोडदौड सुरू केली, त्यामुळेच आज आपण ९० टक्के निवडणूक आधीच जिंकलेली आहे. राणे समर्थकांची ताकद त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिली आहे.”

‘निधीच्या सर्व चाव्या महायुतीकडेच’

विरोधकांवर टीका करताना पालकमंत्री म्हणाले की, केंद्रापासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्व सत्ताकेंद्रे महायुतीकडे आहेत. त्यामुळे विकासासाठी लागणाऱ्या निधीची कोणतीही अडचण येणार नाही. ही निवडणूक आता केवळ औपचारिकता राहिली असून ती पूर्णतः एकतर्फी झाली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेला माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हा बँक संचालक मनीष दळवी, माजी सभापती अशोक दळवी, तसेच श्याम कासार, महेश धुरी, मधुकर देसाई यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा