वीर परिवार सहायता योजना जनजागृती शिबीर संपन्न
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांसाठी (नालसा) वीर परिवार सहायता योजना, २०२५ अंतर्गत जनजागृती शिबीराचे आयोजन ०४ फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कार्यालयात करण्यात आले होते. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे उपस्थित होते. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रभारी सचिव ए.ए. चेंडके, तथा दिवाणी न्यायाधीश (व स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याणाचे सहाय्यक प्रकाश गुरव, मुख्य लोक अभिरक्षक अॅड. आर. एच. वागज, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. श्वेता तेंडुलकर उपस्थित होते. अॅड. श्वेता तेंडुलकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाबाबत जिल्हा विधीसेवा प्राधिकरण प्रतिधारीत विधीज्ञ अॅड. रूपेश परूळेकर, यांनी मार्गदशन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, यांनी या योजनेविषयी माजी सैनिकांना वीर परिवार सहायता योजनेचा लाभ कसा घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले. माजी सैनिक किंवा त्यांचे परिवार यांना मोफत विधी सेवेची आवश्यकता असल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन केले. तसेच अॅड. रूपेश परूळेकर यांनी मार्गदर्शन करताना (नालसा) वीर परिवार सहायता योजना, २०२५ योजनेचा उद्देश काय आहे. त्याचा कोणकोणत्या कायदेशिर बाबींमध्ये लाभ होऊ शकतो याबाबत माहिती देताना त्यांनी मालमत्ता विवाद, कल्याणकारी योजना, वैवाहिक वाद, नागरी वाद आणि इतर कायदेशिर बाबींमध्ये मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा प्रदान केली जाते असे सांगितले. अशा प्रकारे या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.
