जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ अंतर्गत शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी देण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने दिले आहेत. अशी माहिती जिल्हा सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी दिली आहे.
निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औदयोगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सुट्टी उदयोग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उदयोग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औदयोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.
पोटकलम (१) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामान्यतः वेतन मिळणार नाही. या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्या दिवशी त्याला सुट्टी दिली नसती तर त्याने काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल. जर एखाद्या नियोक्त्याने उप-कलम (१) किंवा उप- कलम (२) च्या तरतुदींचे उल्लंघन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही. ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे, त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी, इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.
मतदारास मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, सदर नियोक्त्याविरुध्द नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच उदद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, काराखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८७२ वर संपर्क करावा.
