You are currently viewing सावंतवाडी संस्थानात २० व्या पिढीचा उदय; ‘नवा युवराज’ जन्मला
Oplus_16908288

सावंतवाडी संस्थानात २० व्या पिढीचा उदय; ‘नवा युवराज’ जन्मला

युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले आणि युवराज लखमसांवत भोसले यांना पुत्ररत्न

सावंतवाडी :

कोकणच्या इतिहासात आणि संस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या सावंतवाडी संस्थानात आज आनंदाची सनद वाजली आहे. सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले आणि युवराज लखमसांवत भोसले यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याने संस्थानाच्या विसाव्या पिढीचा उदय झाला आहे.

सावंतवाडी संस्थानाला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. राजघराण्यात नव्या वारसाचे आगमन होणे हा केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित क्षण नसून संपूर्ण संस्थानाच्या वारशासाठी महत्त्वाचा मानला जातो. विसाव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून या बालकाचे आगमन झाल्याने ज्येष्ठ जाणकार आणि इतिहासप्रेमींनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.

राजघराण्यात पाळणा हलल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर, दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांनी राजघराण्याचे अभिनंदन केले आहे.

सावंतवाडीच्या जनतेचे राजघराण्याशी जिव्हाळ्याचे नाते असल्याने, “आमच्या घराण्यातील पाहुणा” अशा भावनेतून सामान्य नागरिकही आनंद व्यक्त करत आहेत.

मुंबईतील एका खासगी रुग्णालयात आज सायंकाळी ही प्रसूती सुखरूप पार पडली. युवराज लखमसांवत भोसले यांनी स्वतः ही आनंदाची बातमी दिली असून माता आणि बालक दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

‘नवा युवराज’ आल्याची बातमी समजताच राजवाड्यावर तसेच सावंतवाडी शहरात एकच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या शुभदिनी सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा